जालना :- ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात २६ जानेवारीला मुंबईत पदयात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी आज (दि.२०) मराठ्यांचे हे वादळ मुंबईकडे निघाले आहे. दरम्यान, चलो मुंबई आंदोलन मागे घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना केले होते. तथापि, आता माघार नाही, मुंबईत आंदोलन होणारच, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की,”राज्य सरकार सोबत माझं बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी बोलण्याची काही गरज नाही. आम्ही आरक्षण मिळण्यावर ठाम आहोत. त्यांच्याशी बोलून काहीही फायदा नाही. मी ठिकाणाहूनच आमरण उपोषण करत मुंबईकडे रवाना होणार, सरकार जाणून बुजून आरक्षण देत नसेल तर मला टोकाचं पाऊल उचलावे लागेल. मला २६ जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण करायचंच आहे. पण या ठिकाणाहुन आमरण उपोषण करत जाण्याचा माझा विचार आहे. समाजाला विचारून तो निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. “
“मी असेन किंवा नसेन, पण मराठ्यांमध्ये फूट पडून द्यायची नाही. छातीवर गोळ्या जरी घातल्या, तरी मागे हटणार नाही.” पुढे बोलत असताना ते म्हणाले की, ” मराठ्यांची मुलं संपवण्याचा घाट घातला जातोय. मराठ्यांची मुलं जीवन संपवत आहेत. तरीही, सरकार गांभीर्यानं घेत नाही. उपोषणामुळे माझ शरीर साथ देत नाही. पण, लढाई टोकाची आहे. आता आरक्षण घेऊन मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे,” यावेळी ते भावूक झाले.
जाहिरात