देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते सोलापुरात लोकार्पण
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते सोलापुरात लोकार्पण करण्यात आले. सोलापुरात असलेल्या कुंभारीतील रे नगरमध्ये १५ हजार घरांचा हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदींनी प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटुंबांना चाव्या हस्तांतरीत केल्या. यावेळी विविध विकासकामांचेही मोदींनी लोकार्पण केलं आहे.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार नरसय्या आडम, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, पंढरपुरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमस्कार करीत आहे. ही वेळ आपल्या सर्वांसाठी भक्तीभावानं भरलेली आहे. २२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. तेव्हा आपले भगवान राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराघरात रामज्योती लावा, असे आवाहनही सोलापूरवासियांना केले. मी सोलापूरवासियांना महाराष्ट्रवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो. मी आता मुख्यमंत्र्यांना ऐकत होतो.
ते म्हणाले की मोदींच्यामुळे महाराष्ट्राचा गौरव वाढत आहे. शिंदेजी, हे ऐकून चांगलं वाटतं. नेत्यांना तर अधिक चांगलं वाटतं. खरं हे आहे की महाराष्ट्राचं नाव रोशन होतंय ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि प्रगतीशील सरकारमुळे होतेय, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रभू श्री राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होत आहेत. तर, सोलापुरात एक लाख लोकांचा नवीन गृहप्रवेश होत आहे. २२ जानेवारीला नवीन घरात गृहप्रवेश केल्यावर रामज्योती प्रज्ज्वलित करावीत. सर्व सामान्य कष्टकरी लोकांना घर किती महत्वाचे असते याची जाणीव मला आहे. तुम्हाला घर मिळत आहे, ते पाहून मला असं वाटतं की, कदाचित मलाही लहाणपणी अशा घरात राहायला मिळालं हवं होतं, असं म्हणत पंतप्रधान मोदी भावूक झाले. देशातील २५ कोटी लोकांनी गरिबीला पराभूत केलं हे मोठं यश आहे. देशाच्या गरिबांना सुविधा दिल्या. साधने दिली. त्यांची चिंता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सर्वात मोठी चिंता दोन वेळची भाकरी…आमच्या सरकारने गरिबांना मोफत रेशन देऊन चिंतामुक्त केलं. अर्धी रोटी देण्याच्या घोषणा दिल्या नाहीत, असा टोलाही यावेळी विरोधकांना लगावला.