ठाणे ; निलेश घाग शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकदाही कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आले नव्हते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही शिंदे यांचीच असा निकाल दिल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांचा पहिला संपर्क दौरा हा कल्याण लोकसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आला आहे
शिवसेना फुटीनंंतर उध्दव ठाकरे यांनी कल्याण डोंंबिवलीत यावे म्हणून दीड वर्षाच्या कालावधीत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी प्रयत्नशील होते. या मागणीला ठाकरे कुटुंबीयांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता. युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही पाठ फिरवल्याने कार्यकर्ते नाराज होते. या नाराजीतून गेल्या वर्षी डोंबिवलीत कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांंनी राजीनामा दिला होता. तो ठाकरे यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आला.
कल्याण लोकसभा मतदार संंघात विद्यमान खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविषयी नाराजी असल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय त्यांचे मित्र पक्षातील आमदारांशी सख्य नसल्याची चर्चा असल्याने या संधीचा फायदा उठविण्याची तयारी उ.बा.ठा पक्षाने सुरू केली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, २७ गाव असा दौरा करणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, असे शिवसेनेतील उ.बा.ठा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कल्याण लोकसभेसाठी उ.बा.ठा.कडून तगडा उमेदवार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घाम फोडण्याची व्यूहरचना उ.बा.ठा.कडून आखली जात आहे. कल्याण लोकसभेसाठी सुभाष भोईर, सदानंद थरवळ यांंची नावे आघाडीवर आहेत. या कामासाठी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांची ग्रामीण भागातून मदत घेतली जाणार असल्याची चर्चा आहे. डोंबिवलीतही भाजपचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार शिंदे यांच्यात खूप सख्य नसल्याचे समजते. या सर्व संधींचा लाभ उठविण्याची तयारी उ.बा.ठा.ने सुरू केली आहे.
जाहिरात