ठाणे : निलेश घाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत आहेत. अवजड वाहनांमुळे नवी मुंबईत कोंडी होऊ नये म्हणून आज, शुक्रवारी ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे.
गुजरात आणि भिवंडी मार्गे हजारो अवजड वाहने उरण जे.एन.पी.टी येथे वाहतुक नेहमीच करत असतात. ही अवजड वाहने ठाण्यातील मुंब्रा, शिळफाटा मार्गे नवी मुंबईत जातात. तसेच नाशिक मार्गे सुटणाऱ्या अवजड वाहनांचा भारही या मार्गावर मोठा असतो. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत वाहतुक करण्यास मुभा आहे.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी नवी मुंबईत येणार आहेत. या कालावधीत मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दुपारी अवजड वाहनांचा भार वाढल्यास कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी अवजड वाहनांना पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत अवजड वाहनांना वाहतुक करण्यास प्रवेश बंदी केली आहे.
जाहिरात