इंफाळ- मणिपूरमध्ये अद्याप शांतता प्रस्थापित झालेली नाही. पोलीस आणि उग्रवाद्यांच्या वाढत्या संघर्षामुळे परिस्थिती पुन्हा नियंत्रणाबाहेर गेली आहे. शनिवारी उग्रवाद्यांनी पोलीस क्वार्टरवर दबा धरून हल्ला केला यात चार कमांडो जखमी झाले आहेत. हल्ल्यासाठी आयईडीचा वापर करण्यात आला आहे. पोलीस क्वार्टरमध्ये विश्रांती घेत असताना हल्ला करण्यात आला असून हल्ला इतका भीषण होता की एका पोलीस अधिकाऱ्याला श्रवणशक्ती गमवावी लागली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उग्रवाद्यांनी शनिवारी रात्री ११.४० च्या सुमारास सुरक्षा दलांवर आरपीजीचा हल्ला केला. त्यानंतर मोरे येथे तैनात असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही उग्रवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. रात्रभर दोन्ही बाजूंनी धुमश्चक्री सुरू होती. विशेष पोलीस कमांडोंच्या बराकींना दबा धरून लक्ष करण्यात आले आहे. तेंगनौपाल जिल्ह्यातील आसाम रायफलच्या मुख्य तळानजीक तैनात असलेल्या विशेष कमांडोंना लक्ष करण्यात आलं आहे. सुरुवातीला बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. त्यानंतर तब्बल ३००-४०० राऊंड फायर करण्यात आले. मोरे येथील काही घरांनाही आग लावण्यात आली आहे. दरम्यान जखमी जवानांवर आसाम रायफल्स कॅम्पमध्ये उपचार सुरू आहेत.
मणिपूरच्या मोरेह येथे काही बंदूकधारी आणि पोलीस कमांडो यांच्यात जोरदार गोळीबार झाला. मोरेह की लोकेशन पॉइंटकडे कमांडो यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना हल्लेखोरांनी लक्ष्य केले. या घटनेची माहिती देतांना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इम्फाळ-मोरेह मार्गावरील एम चाहनौ गाव ओलांडताना हा हल्ल्या झाला. यात पोलीस जखमी झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर आसाम रायफल्सच्या पाच कॅम्पस येथे उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, न्यू मोरेह आणि एम चाहोन गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. मोरेह येथेही दोन घरांना आग लावल्याची घटना देखील उघडकीस आल्या आहेत.