नवी दिल्ली- नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी परिसरात असलेल्या इस्रायली दूतावासाच्या मागे एका इमारतीतल्या रिकाम्या फ्लॅटमध्ये मंगळवारी (२६ डिसेंबर) रात्री मोठा स्फोट झाला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
स्फोटानंतर स्पेशल सेलचं पथक आणि बॉम्बशोधक पथकाने दोन-तीन तास संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली. परंतु, सफोटाशी संबंधित कोणतीही गोष्ट पोलिसांच्या हाती लागली नाही. केवळ स्फोट झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एक पत्र सापडलं. या पत्रात इस्रायली दूतावासाच्या राजदूतांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या पत्रात एक झेंडादेखील गुंडाळण्यात आला होता. पोलीस या पत्राच्या अनुषंगानेदेखील तपास जारी आहे.
दरम्यान, पोलिसांनी या परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये पोलिसांना दोन संशयित व्यक्ती आढळल्या आहेत. एनएसजी आणि एनआयएची दोन पथकं तसेच दिल्ली पोलीस या दोन व्यक्तींचा शोध घेत आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिल्लीतल्या स्फोटाच्या घटनेप्रकरणी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिल्ली पोलिसांनी दूतावासाजवळच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फूटेज तपासलं. त्यामध्ये पोलिसांना दोन संशयित व्यक्ती आढळल्या आहेत. पोलीस अजूनही इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फूटेज तपासत आहेत. ते दोन संशयित कुठून आले आणि कुठे गेले याचा तपास करत आहेत.
पत्रात काय लिहिलंय?…
दिल्ली पोलीस विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं की, दूतावासाजवळ सापडलेल्या पत्रात इस्रायलबद्दल आणि त्यांच्या राजदूतांबद्दल अपमानजनक भाषेत मजकूर लिहिला आहे. हे पत्र टाईप केलेलं आहे.