चिपळूण :- शहरातील वाहतूक कोडींवर उपाय ठरणारा तसेच शहर वाहतुकीला पर्याय असलेला पेठमाप-मुरादपूर पुलाच्या कामाची गती आणखी वाढली आहे. आतापर्यंत १३ पिलरचे काम पूर्ण झाले असून शेवटच्या पिलरचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत सर्व पिलर मार्गी लागून पुढील कामाला चालना दिली जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.
चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर ही दोन मोठी गावे वाशिष्ठी नदीमुळे विभागलेली आहेत. इंग्रजांच्या काळात येथे फरशी बांधली होती. ओहोटीच्या वेळी या फरशीवरून वाहतूक केली जात होती. आतादेखील काही प्रमाणात ती फरशी अस्तित्वात असून त्यावरून हलकी वाहने जात असतात; परंतु भरतीच्या वेळी तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे येथील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्ग बंद पडतो.
त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे येथे पूल व्हावा अशी मागणी नागरिक गेली अनेक वर्षे करत होते. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मुरादपूर पेठमाप असा पूल शासनांकडून मंजूर करून घेतला. त्यासाठी सुमारे १२ कोटी शासनाने मंजूर केले असून पुलाच्या कामाला गेल्यावर्षी सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी ६ पिलरचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर पाऊस कमी होताच पुन्हा कामाला सुरुवात झाली. आतापर्यंत १३ पिलरचे काम पूर्ण होऊन पुढील कामाला गती देण्यात आली आहे. अजून १ पिलरचे काम शिल्लक आहे.
जाहिरात