सोलापूर- शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीवरून परतणाऱ्या बसला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक शिक्षक जखमी झाला आहे. अपघातात ५ ते ६ लहान विद्यार्थी देखील जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही दुर्देवी घटना माळशिरस तालुक्यातील वटपळी परिसरात गुरुवारी (२१ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास घडली. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. या अपघातात शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरे शिक्षक रमाकांत शिरसाठ हे जखमी झाले आहेत.
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी शैक्षणिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन मंगळवारी (१९ डिसेंबर) कोकण दर्शनासाठी गेली होती. या बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. गुरुवारी पहाटे बस गणपतीपुळे येथून इंदापूरकडे येत होती. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरज परिसरात बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. क्षणार्धात बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोवर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता, की बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.
इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल कोकण दर्शन करून परतीचा प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान चालका शेजारील आसनावर शिक्षक बाळकृष्ण काळे बसले होते. सकाळी सहाच्या सुमारास बस माळशिरस तालुक्यात आली. दरम्यान माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे एक टेम्पो उभा होता. या थांबलेल्या टेम्पोला शाळेची शैक्षणिक सहलीची बस (एम.एच१४ बी.टी ४७०१) धडकली. अचानक झालेल्या या अपघातात पुढे बसलेले शिक्षक काळे जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पावले. या अपघातात दुसरा एक शिक्षक व विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इतर विद्यार्थ्यांना सुखरूप आपापल्या घरी पोचविण्यात आले आहे. जखमी झालेल्या शिक्षकाला व विद्यार्थ्यांना अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.