ठाणे : सुशांत गावडे ठाणे महापालिकेच्या जाहिरात शुल्काची रक्कम थकविणाऱ्या विविध होर्डिंगधारकांचे जाहिरात फलक उतरविण्याची कारवाई पालिका प्रशासनाने केली. या कारवाईच्या दणक्यानंतर होर्डिंग
धारकांनी ६३ लाखांची थकीत रक्कम पालिकेकडे जमा केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, चौकात मोठे होर्डिंग उभारण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यापोटी महापालिका संबंधित होर्डिंग धारकांकडून जाहिरात शुल्क वसूल करते. परंतु काही होर्डिंग धारकांनी हे शुल्क थकविले होते. त्यांच्यावर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत, जाहिरात फी थकविलेल्या १८ होर्डिंग वरील जाहिरातींचे फलक उतरवण्यात आले. ही कारवाई सहायक आयुक्त अलका खैरे यांच्या नेतृत्वात जाहिरात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईनंतर, जाहिरातदारांनी त्यांच्याकडे थकीत असलेली ६३ लाख हून अधिक रुपयांची थकीत रक्कम जमा केल्याची माहिती जाहिरात विभागाचे उपायुक्त महेश सागर यांनी दबाव वृत्ताला दिली.