चेन्नई- मिचाँग चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरत असलेल्या तामिळनाडूत पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला आहे.
यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं असून शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. या पूरस्थितीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. महापुराची परिस्थिती पाहता तामिळनाडु सरकारने अनेक जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. थूथुकुडीत परिसराला पुराने वेढा घालत्याने नागरिकांचं घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. दुसरीकडे तुतीकोरीनमधील तिरुचेंदूरमध्ये रविवारी दुपारी दीड वाजेपर्यंत अवघ्या १५ तासांत ६० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
या काळात तिरुनेलवेलीच्या पलायमकोट्टईमध्ये २६ सेमी पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे धरणांमधूनही पाणी सोडण्यात आले असून, त्यामुळे अनेक भागात रस्ते काठोकाठ भरले आहेत. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये घरे पाण्याने भरलेली दिसत आहेत. दरम्यान, धरणांमधून पाणी सोडण्याबाबत आणि जनजीवनाची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. हवामान खात्याने सोमवारी देखील तामिळनाडूमध्ये पावसाचा इशारा दिला.
पुढील सात दिवस तामिळनाडूच्या अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी दक्षिण तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये एक किंवा दोन ठिकाणी, एक किंवा दोन ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार ते शनिवार तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.