
पुणे:- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा रणशिंगं फूंकत माझे वय झाले नाही, आजही भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आयोजित ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमात बोलत होते. या स्पर्धेला खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या बंडानंतर पाच जुलै रोजी एमआयटी कॉलेजमध्ये आयोजित जाहीर सभेतून अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत तुम्ही थांबणार आहात की नाही असे थेट विचारले होते. त्याच दिवशी यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सभेतून खासदार सुप्रिया सुळे यांनी सगळं काही करायचं पण बापाचा नांद नाही करायचा म्हणत शरद पवारांचे समवयस्क व्यक्तींचा दाखला देत अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतरही शरद पवार यांच्या वयावरून सत्ताधारी पक्षातील अनेकांकडून त्यांच्या वयाचा उल्लेख करत टीका केली जातेय. अशातच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आयोजित ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. तेव्हा त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण कोणत्या दिशेने जातेय हे पहावे लागणार आहे.
काय म्हणाले शरद पवार?
आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘माझी एक तक्रार आहे. सगळ्यांच्या भाषणांमध्ये मी 83 वर्षाचा झालो, 84 वर्षाचा झालो, असे म्हणतात. तुम्ही माझ काय बघितलं अजून, मी काही म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काही चिंता करु नका अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.
सरकारला शेतकऱ्यांप्रती आस्था नाही
▪️पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकारमध्ये शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. कांद्यासह शेतमालाला भाव नाही. कांद्याची निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांवर संकट ओढण्याचे काम होत आहे. मात्र आपण एकजुटीने महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहोत असा विश्वासही शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवला.