४१ कामगार बाहेर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून खास पोस्ट; म्हणाले, “माझ्या मित्रांना…”

Spread the love

उत्तराखंड/उत्तर काशी- उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांची अखेर सुरक्षित सुटका झाली आहे. अथक प्रयत्न आणि अनेक आव्हानांना तोंड देऊन एनडीआरएफ, एसडीआरएफसह अनेक परदेशी यंत्रणांनी एकत्र प्रयत्न करून या कामगारांची सुटका केली आहे. १७ दिवसांपासून या क्षणाकडे अनेकांचे डोळे लागले होते. त्यामुळे, त्यांच्या सुटकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ एक्सवर पोस्ट केली आहे.

“उत्तरकाशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचावकार्याच्या यशामुळे सगळेच भावूक झाले आहेत. बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य इच्छितो”, अशी पोस्ट एक्सवर करण्यात आली आहे.

“प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजनांना भेटणार आहेत ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे. या बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांच्या मेहनतीला मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि जिद्दीने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी मिळाली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीमवर्कचे एक अद्भुत उदाहरण ठेवले आहे”, असेही कौतुकोद्गार नरेंद्र मोदींनी उद्गारले.

गेल्या १७ दिवसांपासून हे मजुर बोगद्यात अडकले होते. त्यांनी सूर्याची किरणेही पाहिली नाहीत. पाईपद्वारे त्यांना जेवढं अन्नधान्य, पाणी आणि ऑक्सिजन पुरवला जात होता, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न आणि प्रार्थना केली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धाम यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला होता. या ऑपरेशनसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सहकार्य देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. तसंच, कामगार बाहेर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही नावाचा जयघोष करण्यात आला.

उत्तरकाशीत घडले काय घडले होते?…

१२ नोव्हेंबर २०२३ ला पहाटे सिलक्यारा ते बारकोटदरम्यान निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्याने त्यात ४१ मजूर आत अडकले. बोगद्यात २६० ते २६५ मीटर आतमध्ये मातीच्या ढिगाऱ्यापलीकडे अडकलेल्या मजुरांना बाहेर काढणे उत्तराखंड सरकारसमोर एक आव्हान होते. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा मजुरांना बाहेर काढण्याच्या कामात गुंतल्या. पाईपच्या माध्यमातून त्यांना प्राणवायू आणि खाद्यपदार्थ पाठवणे सुरू केले. वॉकी-टॉकीच्या माध्यमातून मजुरांशी संपर्कही साधण्यात आला होता. बोगद्यात अडकलेले मजूर सिलक्याराच्या बाजूने आत गेले होते. ज्या बोगद्यात ते अडकले होते, त्यात हालचाल करण्यासाठी जवळपास दोन किलोमीटरचा भाग उपलब्ध होता. त्यामुळे मजुरांची घुसमट वगैरे झाली नाही. तसेच विजेचे दिवे असल्यामुळे वावरही सुलभ राहिला.

कोणत्या यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या?..

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस, वेस्टर्न कोल फिल्ड लि.सह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी झाल्या होत्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page