सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बचावासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा आज १७ वा दिवस आहे. सिलक्यारा बोगद्यातून आता कामगारांना बाहेर काढण्यात येत आहे. सुरुवातीला तीन कामगार सुरक्षित बाहेर काढले आहेत. तर आता एक-एक असे हे सर्व 41 कामगार बाहेर काढण्यात येत आहेत.
देहरादून(उत्तराखंड)- उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आलं होतं. मंगळवारी या बचावकार्याचा १७ वा दिवस होता. या बोगद्यात अडकलेले सर्व कामगार एक-एक करुन बाहेर काढण्यात आले आहेत.
कामगारांना अन्न आणि ऑक्सिजनचा केला होता पुरवठा…
मागील 17 दिवसांपासून सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना 17 व्या दिवशी यश आलंय. बचावकार्यासाठी सगळ्या यंत्रणा जोमानं काम करत होत्या. या कामगारांना बोगद्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा त्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत होती. या सर्व कामगारांना अन्न, पाणी, ऑक्सिजनचा वेळोवेळी पुरवठा केला जात होता. तसेच प्रशासन आणि डॉक्टर्स हे या सर्व कामगारांच्या कायम संपर्कात होते.
बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्यात आलं यश-
सिलक्यारा बोगद्यातून कामगारांना बाहेर काढण्यासाठी राबवण्यात येणारी बचाव मोहीम तीव्र करण्यात आली होती. अमेरिकन ऑगर मशीनमुळं घटनास्थळावरील बचावकार्यास गती आली होती. अखेर मंगळवारी बोगद्यातून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे.