अहमदाबाद : एकदिवसीय विश्वचषक २०२३ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यात चुरशीची स्पर्धा होणार हे निश्चित आहे, कारण दोन्ही संघांकडे एकापेक्षा जास्त सामने जिंकणारे खेळाडू आहेत. आता अंतिम सामन्यापूर्वी तुमच्या मनात प्रश्न असेल की हा सामना बरोबरीत सुटला तर विश्वचषक २०१९ प्रमाणे चौकारांच्या संख्येवरुन निर्णय होईल का? तर उत्तर नाही आहे. कारण, आयसीसी ने आता विजेता निवडण्यासाठी काही अन्य नियम लागू केले आहेत. त्यामुळे आता फायनलचे नियम जाणून घेऊया.
चॅम्पियन फक्त सुपर ओव्हरमधून निवडला जाईल –
विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. आता हा सामना बरोबरीत राहिला, तर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचेल. पहिली सुपर ओव्हर असेल, त्यातही निकाल न लागल्यास सामना पुढच्या सुपर ओव्हरमध्ये जाईल आणि सामन्याचा निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर सुरू राहील. होय, विश्वचषक २०१९ प्रमाणे, फक्त दोन नाही तर अधिक सुपर ओव्हर्स असतील, जेणेकरून निकाल घोषित करता येईल. याशिवाय, काही कारणास्तव सुपर ओव्हर शक्य नसल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजयी घोषित केले जाईल. म्हणजेच दोन्ही संघ ट्रॉफी शेअर करतील.
चौकारांच्या नियमांवरून झाला होता बराच वाद –
एकदिवसी विश्वचषक २०१९ ही स्पर्धा इंग्लंडने आयोजित केली होती, या विश्वचषकातील अंतिम सामना हा इतिहासातील सर्वात रोमांचक अंतिम सामना होता. ५० षटकांत बरोबरी झाल्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. यानंतर सुपर ओव्हरही टाय झाल्यानंतर पुन्हा सुपर ओव्हर झाली. दोन्ही सुपर ओव्हर्स बरोबरीत राहिल्यानंतर चौकारांच्या संख्येनुसार इंग्लंडला चॅम्पियन घोषित करण्यात आले. या नियमानुसार, सामन्यात ज्या संघाने जास्त चौकार मारले, त्या इंग्लंडला ट्रॉफी मिळाली. मात्र, या चौकारांच्या नियमावर बरीच टीका झाली. परिणामी, आयसीसीने चौकारांचा नियम रद्द केला आणि आता अंतिम फेरीतील विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हरची संख्या अमर्यादित करण्यात आली आहे.
राखीव दिवस आणि अतिरिक्त वेळ –
उपांत्य फेरीच्या सामन्यांप्रमाणेच आयसीसीने अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवला आहे. पावसामुळे १९ नोव्हेंबरला सामन्याचा निकाल जाहीर झाला नाही, तर सामना २० नोव्हेंबरला त्याच ठिकाणाहून खेळवला जाईल, जिथे १९ नोव्हेंबर रोजी थांबला होता. याशिवाय, अतिरिक्त वेळेचा नियम असा आहे की जर पाऊस पडला तर सामना संपवण्यासाठी १२० मिनिटे म्हणजे दोन तासांचा अतिरिक्त वेळ असेल. या कालावधीत सामना न झाल्यास तो राखीव दिवशी हलविला जाईल. राखीव दिवशीही सामना न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
डीआरएस आणि नो बॉल :
यावेळी ऑटो नो बॉलचा नियम आहे, जसे की मैदानावरील पंचा नो बॉल देऊ शकले नाही, तर तिसरे पंच नो बॉल देऊ शकतात. त्याचबरोबर डीआरएस घेतल्यास अल्ट्रा एज, स्प्लिट स्क्रीन, हॉकआइ इ. सारखेच राहतील. तसेच, दोन्ही संघांना एका डावात प्रत्येकी दोन रिव्ह्यू मिळतील