मुंबई- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शिवसैनिक आज शिवतीर्थावर त्यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन त्यांना मानवंदना देतील. बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज सकाळपासूनच शिवतीर्थावर रीघ लागली आहे.
शिंदेंनी एक दिवस आधीच वाहिली आदरांजली
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गुरुवारी रात्रीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देवून आदरांजली वाहिली. यावेळी शिंदे गटाचे अनेक नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन करुन गेल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर मोठा वाद निर्माण झाला. ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर भिडले. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार…गद्दार…अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली. तर रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून शिवाजी पार्कचा ताबा घेण्याचे काम सुरु होते. तरी देखील दोन्ही गटाकडून घोषणाबाजी थांबली नव्हती.
घटना अत्यंत दुर्दैवी- CM शिंदे
कालच्या या राड्यानंतर आज शीवतीर्थावरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच, काल ज्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. स्मृतिदिनाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही पूर्वसंध्येला जाऊन दर्शन घेतले. तरीही जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
स्मृतिस्थळी चाफ्याचा दरवळ..
शिवसेनाप्रमुखांना चाफ्याची फुले आवडायची. त्यामुळे स्मृतिस्थळी चाफ्याच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून शिवतीर्थ भगवामय झाले आहे. स्मृतिस्थळाजवळ ज्या ठिकाणी बाळासाहेब अनंतात विलीन झाले तिथेही रांगोळी काढून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे. स्मृतिस्थळी एक मशाल अखंडपणे तेवत असते. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या मशालीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची भव्य तसबिर लावण्यात आली आहे.
उद्या फार महत्त्वाचा दिवस – अनिल देसाई
दरम्यान, शीवतीर्थावरील शिंदे गट व ठाकरे गटाच्या राड्यावर शिंदे गटाचे नेते अनिल देसाई यांनी म्हटले आहे की, आमच्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य वेचले त्यांचा स्मृतीदिन आहे. काही जण तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणीही इथे विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विघ्न येऊ देणार नाहीत. त्यासाठी हा दिवस नाही.