कानपूर- नवीदिल्लीहून दरभंगाला जाणाऱ्या हमसफर एक्सप्रेस ट्रेनला भीषण आग लागली आहे. ट्रेनचे काही डबे जळून खाक झाले असून प्रवाशांना गाडीतून उड्या टाकून जीव वाचवावा लागला आहे.
उत्तर प्रदेशमधील इटावाच्या सराय भूपत रेल्वे स्टेशनवर ही दुर्घटना घडली. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ट्रेनच्या डब्यातून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच स्टेशन मास्टरने तात्काळ ट्रेन थांबवली.
काही प्रवाशांनी आधीच डब्यातून उड्या टाकल्या होत्या. दरम्यान सर्व प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले आहे. बिहारमध्ये छट पूजेचा सण आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी सतर्कता दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान घटनेनंतर रेल्वेचे अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.