
शिर्डी/ जनशक्तीचा दबाव-
कोट्यवधींची आभूषणे, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, हजारो भाविकांचा दीपोत्सव व देश-विदेशातील भाविकांच्या साक्षीने रविवारी सायंकाळी विश्वाला श्रद्धा आणि सबुरीबरोबरच सर्वधर्माची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या ऐश्वर्यसंपन्न धनलक्ष्मीचे पूजन साई संस्थानचे डेप्युटी सीईओ तुकाराम हुळवले आणि त्यांच्या पत्नी ज्योती हुळवले यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी साई संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा आणि त्यांच्या पत्नी मालती यार्लगड्डा उपस्थित होते. या वेळी साईबाबांना सुमारे ३ कोटी ७५ लाख किमतीची आभूषणे घालण्यात आली होती. त्यात हिरेजडित रत्नांचा मुकुट व सुवर्णजडित शालीचा समावेश होता. साई मंदिर व मंदिर परिसर रोषणाई व विविधरंगी फुलांच्या सजावटीने खुलला होता. दरवर्षीप्रमाणे साईबाबांच्या लक्ष्मीपूजनानंतर देशातील भाविकांचा ओघ ऑनलाइन दर्शन पास घेऊनच सुरू झाला. साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे स्थानिक शिर्डीकर आणि भाविकांनी साईबाबांच्या दीपोत्सवास खंड पडू न देता द्वारकामाई परिसर आणि साईबाबांच्या लेंडीबागेत उत्साहात दीपोत्सव साजरा केला. साईबाबा संस्थानचे डेप्युटी कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले आणि त्यांच्या पत्नी ज्योती तुकाराम हुळवले यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता साईबाबांचे लक्ष्मीपूजन करण्यात आले. दीपावलीचे चारही दिवस साईबाबांना सुगंधी उटणे लावून साईबाबांच्या मूर्तीस मंगलस्नान घालण्यात आले. साईंना नैवेद्यात लाडू, चकली, चिवडा, करंजी असे फराळ होते. नवीन वस्र परिधान करून साईबाबांना अलंकार चढवण्यात आले.
☯️साईंच्या दरबारात असे झाले लक्ष्मीपूजन..
सायंकाळी ५ वाजता समाधी चौथऱ्यावर रोषणाई केलेला चौरंग, त्यावर नक्षीदार सुवर्णकलश, त्यात पारंपरिक चांदीची नाणी, चांदीच्या कमळात उभी असलेली लक्ष्मीची व साईबाबांची मूर्ती मांडून पूजा करण्यात आली. पूजेआधी उपकार्यकारी अधिकारी हुळवले यांच्या हस्ते साई समाधी मंदिराच्या तळघरात पूजन करण्यात आले. नंतर लक्ष्मीपूजन झाले. सायंकाळी ६ वाजता साईंच्या धुपारतीनंतर ६.४५ वाजता भाविकांसाठी दर्शनलाइन सुरू केली.
☯️लक्ष्मीपूजनाला १०० वर्षांची परंपरा, १९२२ मध्ये प्रथम सुरुवात..
साई मंदिरातील लक्ष्मीपूजनाला १०० वर्षांपासूनची परंपरा आहे. १९२२ मध्ये प्रथम साई संस्थानची निर्मिती झाल्यानंतर लक्ष्मीपूजनास सुरुवात झाली. साईबाबांच्या लक्ष्मीपूजनानंतर साई मंदिर परिसरातील लेंडीबागेत लाखो भाविकांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. साईंच्या समाधीनंतर १०२ वर्षांत साईबाबांची महती देश-विदेशात सर्वदूर पोहोचल्याने भाविकांच्या संख्येसाठी देशातील क्रमांक एकचे, तर दानामध्ये क्रमांक दोनचे देवस्थान ठरले.
☯️मेडिकल फंडासाठी भाविकांकडून १२ लाखांची देणगी..
दीपावली उत्सवानिमित्त साईसमाधी मंदिर व परिसरात भुवनेश्वर येथील साईभक्त सदाशिव दास यांच्या देणगीतून विविधरंगी फुलांची आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली, तर आंध्रप्रदेशातील साईभक्त श्रीमती एम. श्रीनिवास राव यांनी मेडिकल फंडासाठी १२ लाखांची देणगी दिली.
☯️विविधरंगी फुलांनी मंदिर परिसरात सजावट
विविधरंगी फुलांनी मंदिर परिसर व व समाधी मंदिरात विविधरंगी फुलांची सजावट करण्यात आली. त्यामुळे मंदिर परिसर फुलांनी व विद्युत रोषणाईने झळाळून निघाला. साईसमाधी मंदिर व मंदिराच्या कळसाला केलेल्या विद्युत रोषणाईने शिर्डीकरांचे लक्ष वेधून घेतले. साईमंदिर परिसरात व प्रवेशद्वाराजवळ आकर्षक रांगोळ्या काढल्या.
☯️साई संस्थानची संपत्ती
▪️ठेवी २५०० कोटी रुपये
▪️सोने ५५० किलो
▪️चांदी ६५०० किलो
▪️हिरे १४ कोटी रुपयांची