नवी दिल्ली /जनशक्तीचा दबाव- भारताचे माजी उपपंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्रीपदासह अनेक जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी 96 व्या वर्षांत प्रवेश केला आहे.
यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा आडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
पंतप्रधान मोदींनी अडवाणी यांचे वर्णन “प्रामाणिकपणा आणि समर्पणाचे प्रतीक, ज्यांनी आपल्या देशाला मजबूत करण्यात अतुलनीय योगदान दिले आहे, अशा शब्दांत केले आहे.
मोदी म्हणाले, त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने राष्ट्रीय प्रगती आणि एकता पुढे नेली आहे. मी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. आडवाणींचे राष्ट्र उभारणीसाठीचे प्रयत्न 140 कोटी भारतीयांना प्रेरणा देत राहतील.
अमित शहा यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये अडवाणींना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,आडवाणीजींनी त्यांच्या अथक परिश्रमाने आणि संघटनात्मक कौशल्याने पक्ष वाढवला आणि कार्यकर्त्यांना घडवण्याचे काम केले.
भाजपच्या स्थापनेपासून ते सत्तेत येण्यापर्यंत आडवाणीजींचे अतुलनीय योगदान प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी चिरंतन प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान लालकृष्ण आडवाणीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ते भारतीय राजकारणाचे प्रमुख आधारस्तंभ राहिले आहेत आणि त्यांनी भाजप संघटनेलाही मोठे बळ दिले आहे. प्रदीर्घ काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या अडवाणीजींचे योगदान अतुलनीय आहे.