
मुंबई- अमली पदार्थाचे सेवन आणि विक्रीविरुद्ध सूचना देणारे फलक मुंबईतील बियर बार, रेस्टोरंट, पबमध्ये लावण्यात येणार आहे. नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरो (NCB) यांच्या विनंतीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने हे फलक लावण्याचे निर्देश दिले असले तरी हॉटेल, बार, पब मालकांनी या सूचना फलकाला विरोध दर्शविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एनसीबी (NCB)च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीने महाराष्ट्रात किमान १,२०० बार, पब आणि रेस्टॉरंट्स यांची यादी तयार केली आहे, या यादीनुसार हे फलक त्या ठिकाणी लावले जाणार आहे. या १,२०० आस्थापनापैकी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने ५८६ आस्थापनांवर यापूर्वीच या पद्धतीचे फलक लावण्यात आले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हॉटेल, बार, पब मालकांचा विरोध
या उपक्रमाला आस्थापना (हॉटेल, बार, पब) मालकांकडून मोठा विरोध झाल्याचे सूत्रांनी सांगितले. “आम्हाला बार आणि हॉटेल मालकांचे अनेक कॉल आले होते की, बोर्ड लावण्याची गरज काय आहे. आम्ही त्यांना काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले अन्यथा कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे अधिकारी म्हणाले. सूचना फलक हे प्रवेशद्वाराच्या बाहेर लावले पाहिजेत आणि ते ठळकपणे दिसले पाहिजेत. अमली पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे, हे तरुणांनी जाणून घेतले पाहिजे. हा एक उपक्रम आहे ज्याची आम्ही मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले.