इंडियन मेडीकल असोसिएशनच्या गुणगौरव व कलादर्पण कार्यक्रम उत्साहात संपन्न
चिपळूण- कोरोना काळात डॉक्टरांनी देवदूताची भूमिका बजावली कोरोना काळात डॉक्टर काय हे आपल्याला कळले. हातात पैसे होते मात्र उपचार मिळत नव्हते. अशावेळी महाराष्ट्रातील डॉक्टरांनी मोठे काम केले. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीत डॉक्टरांचे महत्त्व कळले. प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्व महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर हा शेवटी माणूसच असतो. त्यामुळे आज कलादर्पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आपल्या कला सादर करणार आहेत. शेवटी व्यवसाय असला तरी कला जपली पाहिजे, असे उद्गार चिपळूणचे आ. शेखर निकम यांनी व्यक्त केले. इंडियन मेडीकल असोसिएशनच्या गुणगौरव व कलादर्पण कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी आ. रमेश कदम, सदानंद चव्हाण, आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र राजमाने, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, तहसीलदार प्रवीण लोकरे, प्रशांत यादव, संघटनेचे सचिव डॉ. संतोष कदम, डॉ. राजेश इंगोले, संतोष कुलकर्णी, डॉ संघमित्रा फुले, डॉ .अनिरुद्ध आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील बांदल हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.यावेळी बोलताना आ. निकम म्हणाले, अनेक डॉक्टरांना कलेची आवड असते. मात्र, त्यांच्या व्यवसायामुळे ते कलेला न्याय देऊ शकत नाहीत. त्यांना वेळ मिळत नाही. मात्र,आयएमएसारख्या संघटनेच्या माध्यमातून फोटोग्राफीपासून नृत्य, संगीत, नाट्य अशा अनेक स्पर्धा आयोजित केल्या आणि त्यातून कला जोपासण्याचे काम केले आहे. प्रत्येक व्यक्तीला एखादा छंद असलाच पाहिजे. आज चिपळूणला आयएमएचा बक्षीस वितरण समारंभ होत आहे. या पुढच्या काळात अशा स्पर्धा आयोजन करण्याची संधी चिपळूणला द्यावी. चिपळुणातील संघटना हे यजमानपद स्वीकारतील. त्यामुळे आयएमएच्या महाराष्ट्र संघटनेने चिपळूणला असा मोठा कार्यक्रम घेण्याची संधी द्यावी. आम्ही तो विश्वास सार्थ ठरवू, असे आ. निकम यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आ. रमेश कदम म्हणाले, आज डॉक्टर हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शेवटी तो एक माणूस आहे हा विचार प्रत्येकाने करायला हवा. अनेकवेळा रुग्ण दगावला की डॉक्टरांवर हल्ले होतात. ते होता कामा नयेत. डॉक्टर शेवटपर्यंत रुग्ण वाचावा म्हणून प्रयत्न करीत असतो. आपल्या व्यवसायातून वेळ काढून आज डॉक्टर कलादर्पणसारखा सांस्कृतीक महोत्सव घेत आहेत या बद्दल समाधान व्यक्त केले. माजी आ. सदानंद चव्हाण म्हणाले प्रत्येकाच्या आयुष्यात डॉक्अर महत्त्वाचा आहे. माणसाचे जीवन निरोगी असेल तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी असो, नागरिक असो, लोकप्रतिनिधी असो या सर्वांनाच डॉक्टरांची गरज आहे. चांगले आरोग्य राहाण्यासाठी डॉक्टरकडे जायलाच लागते. त्यामुळे डॉक्टरांचे महत्त्व मोठे आहे, असे उद्गार काढले. प्रशांत यादव यांनी आयएमएच्या कलादर्पण कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यभरातून अनेक डॉक्टर्स व संघटनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमप्रसंगी नृत्य, नाट्, चित्रकला, फोटोग्राफी व अन्य प्रकारातील स्पर्धेत यशस्वी झालेल्या राज्यभरातील डॉक्टरांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रशस्तीपत्रक, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी आयएमएचे राज्याध्यक्ष रवींद्र कुटे म्हणाले, चिपळूणने हे अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले. सलग तीनवेळा आयएमएचे चिपळूण अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाले आणि त्याचे त्यांनी उत्तम नियोजन केले या बद्दल अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. यतीन जाधव व संघटनेचे सचिव डॉ. कदम, आभार डॉ. अब्बास जबले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. कांचन मदार, डॉ. ज्योती यादव, डॉ. मनिषा वाघमारे, डॉ. अजय सानप, डॉ. अमोल निकम आदींनी मेहनत घेतली. यावेळी चिपळुणातील नऊ डॉक्टर आयएमएमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राज्यभरात आयएमए सदस्य संख्या पन्नास हजारावर झाली आहे.
चौकट :
डॉक्टर नाच-गाण्यावर थिरकले…
‘आयएमए’च्या राज्यस्तरीय कलादर्पण सोहळ्यात डॉक्टर नाच-गाण्यावर थिरकले. एरव्ही रुग्णांना तपासणारे, त्यांच्या उपचारात दिवसभर मग्न असणारे, वैद्यकीय व्यावसायिक असलेले डॉक्टरर्स चिपळुणात राज्यस्तरीय कलादर्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते. बीड, नंदूरबार, यवतमाळ, नाशिक, ठाणे व अन्य जिल्ह्यातील डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी ढोल, लेझिम तसेच कथ्थक, रेकॉर्ड डॉन्स, कराओके आदी नाच-गाण्यांवर डॉक्टरांनी ठेका धरला तर अनेकांनी आपल्या कला देखील सादर केल्या.
फोटो : कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना आ. शेखर निकम यांच्या सोबत मान्यवर व्यासपीठावर छायाचित्रात दिसत आहे(छाया : ओंकार रेळेकर)
फोटो : कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात मौलाचे सहकार्य करणाऱ्या डॉ.यतीन जाधव यांचा सन्मान करतांना आ. शेखर निकम यांच्यासह
डॉ. रविंद्र कुटे, रमेश कदम, डॉ. राजेश इंगोले छायाचित्रात दिसत आहे.