‘समृद्धी’वर बसवणार 80 सीसीटीव्ही; 206 किमीदरम्यान अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस सिस्टिम..

Spread the love

1,400 कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई – 06 नोव्हेंबर : समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या मालिकांना ब्रेक लावण्यासाठी प्रशासनाने काही उपाययोजना केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा आणि जालना या जिल्ह्यांतून जाणाऱ्या 206 किलोमीटर अंतरात 80 सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) लावण्यात येणार आहेत. त्याचे लोकेशनही अंतिम झाले आहे. हे कॅमेरे “इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ अंतर्गत (आयटीएमएस) बसवले जाणार आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आम्ही प्रस्ताव सादर केला आहे. त्यात कॅमेरा बसवण्याच्या लोकेशनचा समावेश आहे. या लोकेशननुसार सीसीटीव्ही बसवले जातील. हे काम सुरू करण्याची तारीख अद्याप निश्‍चित केलेली नाही. परंतु लवकरच काम सुरू होईल, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांनी लेन कटिंग, ओव्हर स्पीडच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी स्पीड गनऐवजी तातडीने सीसीटीव्ही बसवा, असे आदेश ‘एमएसआरडीसी’ला दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर जांबरगाव येथे अपघात होऊन 12 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर मंत्री भुसे यांनी ‘एमएसआरडी’च्या अधिकाऱ्यांना तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे पुन्हा आदेश दिले. ही यंत्रणा बसवल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंडाची पावती घरपोच पाठवण्यात येणार आहे.

या सीसीटीव्हीचे कार्यान्वयन ऑप्टिकल फायबरद्वारे करण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) मुख्यालयाकडे छत्रपती संभाजीनगर विभागाने प्रस्ताव पाठवला आहे. ही सिस्टिम सुरू करण्यासाठी 2024ची डेडलाइन दिली आहे. एन्ट्री, एक्‍झिट, टोलवसुली आदी कामांवर निगराणी मुंबई ते नागपूर या 701 किमी अंतराच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर 1,400 कोटी रुपये खर्च करून ‘आयटीएमएस’ बसवण्यात येणार आहे. त्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. लेन कटिंग, ओव्हरस्पीड, टोलनाक्‍यांवरील एन्ट्री, एक्‍झिट आणि टोलच्या वसुलीवर सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page