ठाणे : ड़ोंबिवली पूर्व भागातील फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कामगारांना दररोज धमक्या, शिवीगाळ करण्याचे प्रकार फेरीवाल्यांकडून सुरू आहेत. बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भायखळा, अंधेरी, मस्जिद भागातील आहेत. काही फेरीवाले गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याच्या तक्रारी आहेत. असे असतानाच, ग प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक मंगळवारी संध्याकाळी उर्सेकर वाडी भागात फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करत होते. फेरीवाल्यांच्या आडोशाला लपून ठेवलेले सामान जप्त केले जात होते.
ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाला धक्काबुक्की,
यावेळी राहुल गुप्ता या फेरीवाल्याचे सामान जप्त करताच त्याने आक्रमक भूमिका घेऊन पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे आणि त्यांच्या कामगारांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. पथकावर गैरव्यवहार करण्याचे आरोप करत त्याने विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. गुप्ता याला पाठिंबा देण्यासाठी ५० हून अधिक फेरीवाले पालिका पथकावर हल्ला करण्याच्या तयारीत होते.
तक्रार दाखल
ग प्रभागातील कामगार सुनील सुर्वे हे शनिवारी पथक प्रमुख साळुंखे यांच्या बरोबर फेरीवाले हटविणे आणि सामान जप्तीची कारवाई करत होते. यावेळी उर्सेकर वाडीतील फेरीवाले बाबू चौरासिया, दिलीप गुप्ता,अनिल गुप्ता यांनी सामान जप्त करण्यास विरोध केला आणि एकटा सापडला की मारण्याची धमकी दिली. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जाहिरात