राजापूर, जनशक्तीचा दबाव- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देतानाच शिक्षक पतपेढीच्या विद्यमान पॅनेलच्या माध्यमातून सभासदाभिमुख कारभार करताना सभासदांचे हित जोपासण्याचे काम केलेले आहे. यावेळची निवडणुक ही महायुतीच्या माध्यमातून लढविली जात असून पाच वर्षात केलेले काम आणि आगामी काळातील नियोजन यामुळे सभासदांचा महायुतीच्या उमेदवारांना वाढता पाठींबा मिळत आहे. रविवार 4 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत राजापूर तालुका सर्वसाधारण गटातील उमेदवार विजय खांडेकर यांसह सर्व जिल्हा राखीव गटातील उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार आणि महायुतीचे पॅनेलप्रमुख विजयकुमार पंडीत यांनी केले आहे.
रविवार 4 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी विजयकुमार पंडीत यांनी पत्रकार परिषद घेत महायुती पॅनेलची भूमिका मांडली. यावेळी पतपेढीचे राजापूर तालुका सर्वसाधारण गटाचे उमेदवार विजय खांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष अनाजी मासये, सुधाकर जाधव, धोंडू लांजेकर, पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष विलास जाधव आदी पदाधिकारी उपस्थीत होते.
यावेळी श्री. पंडीत यांनी यावेळची पतपेढीची निवडणुक शिक्षक समिती महायुतीच्या माध्यमातून लढवत आहे. अखिल शिक्षक संघ, राज्य उदृर् संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख संघटना, शिक्षक सेना या संघटनांनी पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे शिक्षक सभासदांच्या भक्क्म पाठबळावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. मागील पाच वर्षाच्या कालावधीत पारदर्शक कारभार करीत सभासदांचे हीत जोपासण्याचे काम केले गेले आहे. कर्जमर्यादा 50 लाखांपर्यंत वाढविताना, कर्जावरील व्याजाचे दर कमीत कमी तर ठेवींवर 8.50 टक्के पर्यंत देण्यात आले आहेत. कोवीड मधील कोवीडग्रस्त सभासदांना 2 लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.आकस्मीक कर्जमर्यादा 80 हजार करण्यात आली, शैक्षणिक कर्ज मर्यादा 10 लाख करण्यात आली असे अनेक निर्णय विद्ममान संचालक मंडळाने घेतलेले आहेत. येणाऱ्या काळात सभासदांसाठी विम्यावर आधारीत आरोग्य आधार योजना आणणे, डिजिटल स्वाक्षरीने ठराविक रक्कमेपर्यंत कर्जाची व्यवस्था करणे असे सभासदांचे हिताचे धोरण आखले आहे. त्यामुळे महायुती पॅनेलच्या उमेदवारांना सभासदांचा वाढता पाठींबा मिळत असल्याचे श्री. पंडीत म्हणाले.
तर यावेळी राजापूर तालुका उमेदवार असलेले विजय खांडेकर यांनी गेली 31 वर्षांपासून संघटनेचे काम करत असून संघटनेत कार्यध्यक्ष, तालुकाध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे. या माध्यमातून शिक्षक बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. या निवडणुकीत आपणाला सभासदांचा मोठा पाठींबा मिळत असून संचालक पदाच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. राजापूर येथे स्वमालकीच्या जागेत शाखेचे कामकाज सुरू असले तर भविष्यात स्वताची स्वतंत्र जागा घेवून सुसज्य वास्तु उभी करण्याचा आपण प्रयत्नाशिल राहणार आहोत. तर सभासदांना कॅशलेस आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे खांडेकर यांनी केले.