या सोहळ्याचे साक्षीदार होणे माझे भाग्यच – पंतप्रधान नरेंद्र मोदी
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींना अयोध्येत राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं. मोदींनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे.
नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन २२ जानेवारी २०२४ ला होणार आहे. या विशेष सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होतील. खुद्द मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली.
पंतप्रधान मोदींना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं :
भगवान रामाच्या मूर्तीचा अभिषेक २२ जानेवारीला होणार आहे. दुपारी १२.३० च्या सुमारास मूर्ती अभिषेक सोहळा पार पडेल. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय, रामजन्मभूमी ट्रस्टच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा आणि उडिपीचे शंकराचार्य यांनी आज (२५ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. मोदींनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे.
या सोहळ्याचा साक्षीदार होणं भाग्याचं – मोदी :
निमंत्रण स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी लिहिलं, ‘जय सियाराम! आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. आत्ताच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अधिकारी मला माझ्या निवासस्थानी भेटायला आले होते. त्यांनी मला श्री राम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठान सोहळ्यासाठी अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं. मला खूप धन्य वाटत आहे. माझ्या आयुष्यात मी या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होणार हे माझे भाग्य आहे.’
मोदींनीचं केली होती बांधकामाची पायाभरणी :
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनीही एक निवेदन जारी करून पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीची माहिती दिली. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी केली होती. तब्बल साडेतीन वर्षांनंतर आता हे भव्य मंदिर बनून तयार होणार आहे. आता मोदी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात यजमानाची भूमिका बजावतील.