देवेंद्र फडणीस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर निलेश राणे यांचा राजीनामा मागे; ‘सागर’वर काय घडलं?

Spread the love

आम्ही सर्वजण पक्ष संघटना म्हणून जोमाने काम करतो. कार्यकर्त्यांच्या जीवावर आमची मदार असते. पण आमचं लक्ष फक्त लोकसभा आणि विधानसभेकडे असतं. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमचं दुर्लक्ष होतं. कार्यकर्त्यांना अडचणी येतात त्या समजून घ्यायला पाहिजे. अशावेळी प्रमुख नेत्यांनी त्यात लक्ष द्यावं, असं निलेश राणे यांचं म्हणणं होतं.

मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांची अखेर नाराजी दूर झाली आहे. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलेश राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात झालेल्या बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाली आहे. तशी माहितीच रवींद्र चव्हाण यांनी मीडियाला दिली आहे. सिंधुदुर्गात निलेश राणे यांच्या नेतृत्वात पक्षाचा झंझावात कायम राहील, असं सांगतानाच निलेश राणे यांनी जो मुद्दा मांडला त्याची दखल घेण्यात आल्याचंही रवींद्र चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.

निलेश राणे यांनी काल तडकाफडकी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही त्यांची समजूत घातली. पण निलेश राणे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण या दोन्ही नेत्यांना सागरवर बोलावलं. या दोघांशीही चर्चा केली. तसेच निलेश राणे यांची समजूत काढून त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय होण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे निलेश राणे यांनीही आपला राजीनामा मागे घेत पक्षात सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट केलं.

फडणवीस यांच्याशी चर्चा

या बैठकीनंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे मीडियासमोर आले. चव्हाण यांनीच मीडियाशी संवाद साधून सर्व गोष्टींचा उलगडा केला. काल निलेश यांनी एक ट्विट केलं. त्यांनी काही निर्णय घेतल्याने आमच्यासारख्या प्रत्येकाला नक्की काय घडलं हे कळत नव्हतं. नंतर मी नारायण राणे यांच्याशी चर्चा केली. नारायण राणे यांनीही निलेश यांना नक्की काय घडलं ते विचारलं. त्यानंतर आज सकाळी मीही निलेश यांच्याशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा निलेश राणे यांच्याशी बोलले. काही तरी घडलं होतं. त्यामुळे हे होतंय हे लक्षात आलं. संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला वाटत असतं की कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. त्यामुळे निलेश यांनी ही भूमिका घेतली होती, असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.

म्हणून निर्णय घेतला

ज्यावेळी छोटा कार्यकर्ता पक्षात काम करत असतो. त्यावेळी त्याच्या अडचणी सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजे, हे निलेश यांचं म्हणणं होतं. ते रास्त होतं. आम्ही आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकांचाच विचार करत असतो. पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत छोट्या कार्यकर्त्यांना लढायचं असतं. त्यांचा विचार आमच्याकडून पाहिजे तसा होत नाही. छोट्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्या न जाणून घेतल्याने निलेश राणे नाराज होते. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना नेते जाणून घेत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, असं चव्हाण म्हणाले.

झंझावात सुरूच राहील

आम्ही सर्वांनी छोट्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नात स्वत: लक्ष घालण्याचं ठरवलं आहे. ज्या ठिकाणी लक्ष घातलं जात नाही. तिथे लक्ष घालू. त्यांना आश्वासन दिलं. एक चांगला कार्यकर्ता पक्षाच्या कामातून बाहेर जाणं पक्ष संघटनेला परवडणारं नाही. मी त्यांना आग्रह केला. असं करू नका. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगली चर्चा झाली. त्यामुळे निलेश यांची नाराजी दूर झाली आहे. निलेश राणे यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्गात झंझावात सुरू राहील, असंही त्यांनी सांगितलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page