इंदापूर (पुणे) :- रविवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. आजवरच्या शांततेच्या युध्दानेच सरकार जेरीस आलेले आहे. त्यामुळे उग्र आंदोलन करु नका. आरक्षणासाठी आत्महत्या करु नका. मंडळनिहाय गावात जावून जागृती करा, असे आवाहन मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज प्रशासकीय भवनाशेजारच्या पटांगणात झालेल्या विराट सभेत केले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते.
ते म्हणाले की, आरक्षणाचा कायदा पारित करण्यासाठी सरकारच्या आवाहननुसार आपण त्याला एक महिना व जास्तीचे दहा दिवस दिले. येत्या २४ तारखेला त्यास ४० दिवस पूर्ण होत आहेत. आरक्षणाचा घास हातातोंडाशी आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एका ही मराठ्याच्या पोराने आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर पोरे मरायला लागली तर आरक्षण द्यायचे कुणाला अन् आंदोलन करुन त्याचा उपयोग काय असा सवाल त्यांनी केला.
आरक्षणाच्या बाबतीत त्यांचा एक ही डाव आत्तापर्यंत आपण यशस्वी होऊ दिला नाही. पुढेही होऊ द्यायचा नाही म्हणून आता त्यांचे नाव घ्यायचे नाही, असे ते म्हणाले. आता त्यांनी बहुतेक आपलेच लोक आपल्या विरोधात उठवायचे ठरवले आहे. तो ही त्यांचा डाव आपण हाणून पाडायचा आहे. त्यासाठी २४ तारखेपर्यंत शांत रहायचे आहे. कोणाच्या टीकेला उत्तर द्यायचे नाही. कोणाचे नाव घ्यायचे नाही. २४ तारखेनंतर मात्र त्यांची गाठ मराठ्यांशी आहे. मग बघू कोण कोण येते ते अशा शब्दात त्यांनी आरक्षणविरोधकांना आव्हान दिले. प्रास्ताविक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण पवार यांनी केले.