शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे प्रशिक्षण सुविधा उपलब्ध.
जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | ऑक्टोबर २०, २०२३.
शिक्षक पतपेढी सभागृह, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे काल गुरूवार दि. १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ०४:३० वा. स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमासाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातून तर राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, श्री. अजितदादा पवार तसेच कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी सह्याद्री अतिथीगृहातून उपस्थिती लावली. ५११ कौशल्य विकास केंद्रांवरून जवळपास ५.५ लाखांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, संस्था पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांत कार्य सामाजिक करणाऱ्या व्यक्तींनी सभागृहामध्ये एकत्रितपणे हा उद्घाटन सोहळा पाहीला.
केंद्र सरकारच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे सुरू करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल ५११ केंद्रांचे उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की नवरात्रीच्या या पवित्र पर्वामध्ये प्रत्येक आईला तिच्या लेकराच्या भविष्याची सतावत असणारी चिंता दूर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केला आहे. शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात शहरात जाणारी तरुण पिढी गावी स्थायिक व्हावी, यासाठी त्यांना गावातच रोजगार मिळावा या गोष्टी लक्षात घेऊन कौशाल्याधिष्ठीत शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरांकडे वाढणारा ओघ थांबवण्यासाठी ग्रामीण जीवन समृद्ध होने गरजेचे आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन या योजनेची रचना केली आहे.” आज राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ५११ केंद्रे सुरू करण्यात आली. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ११ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. भविष्यात आवश्यकतेनुसार या केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येईल.
ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा त्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा विकास व्हावा हा यामागील उद्देश आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मा. आमदार श्री. बाळ माने, जि.प. रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार श्री. म्हात्रे साहेब, भाजपा रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. दादा दळी, पं.स. रत्नागिरीचे माजी सदस्य व रत्नागिरी भाजपाचे सरचिटणीस श्री. सुशांत पाटकर, श्री. उमेश देसाई, श्री. योगेश मुळे यांच्यासह जवळपास ५५० ते ६०० विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच सामाजिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींची उपस्थिती लाभली.