रत्नागिरी :- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला ४५ जागा मिळतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीत केला.
भाजपच्या महाविजय २०२४ संकल्प यात्रेसाठी बावनकुळे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी रात्री रत्नागिरीत दाखल झाले. आज गुरुवारी सकाळी त्यांनी भाजपच्या वॉरियर्सशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने गेल्या नऊ वर्षात देशात अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. देशाला जगात सर्वोत्तम करण्यासाठी गेल्या नऊ वर्षात त्यांनी प्रयत्न केला आहे, त्यामुळेच देशातील लोकांना ते पुन्हा पंतप्रधान व्हावेसे वाटतात. आपण आतापर्यंत ३२ हजाराहून अधिक लोकांना भेटलो. त्यातील फक्त १३ लोक सोडून बाकी सर्वांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचेच नाव घेतले. राज्यातील ९० टक्के लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजप महायुतीचा उमेदवार ५१ टक्के मते घेऊन विजयी होईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ६० हजार घरांपर्यंत पोहोचण्याचा म्हणजेच या मतदार संघातील साडेतुन लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प वॉरियर्सच्या बैठकीत करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट लावली – बावनकुळे यांचा आरोप
उद्धव ठाकरे यांनीच हिंदुत्त्वाची वाट लावली आहे आणि आता लोकांनाही ते कळले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की , महाविकास आघाडी सत्तेत असताना केंद्र सरकारने निधी दिला नाही. मात्र महायुती सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात राज्यात निधी येत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र अडीच वर्षात केवळ दोनदाच मंत्रालयात गेलेले फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या योजनांसाठी किती प्रस्ताव पाठवले ? त्याचा कितीवेळा पाठपुरावा केला, असा प्रश्न बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे अडीच वर्षे झोपून राहीले. महाराष्ट्राला अडीच वर्षे मागे टाकण्याचे काम त्यांनी केले. ते जर प्रस्ताव घेऊन गेलेच नाहीत, तर निधी कसा मिळणार, असा प्रश्न बावनकुळे यांनी केला.