धीरज कुमार सिंग झाले पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परिक्षा उत्तीर्ण.
जनशक्तीचा दबाव न्यूज | नवी दिल्ली | फेब्रुवारी ०५, २०२३.
यूपीएससी परीक्षा ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा मानली जाते. या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर IAS, IPS, IFS किंवा IRS यांसारख्या पदांवर सरकारी सेवेत नोकरी मिळू शकते. IAS धीरज कुमार सिंग हे त्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत, ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
सुरुवातीला एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर धीरज कुमार सिंग यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी दरमहा लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरीही नाकारली होती. IAS धीरज कुमार सिंह अभ्यासात खूप हुशार होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हिंदी माध्यमात झाले. इयत्ता १२वी बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवल्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून एमबीबीएस केले. डॉक्टरची पदवी घेतल्यानंतर त्यांनी बीएचयूमधून एमडीचे शिक्षणही पूर्ण केले.
धीरज कुमार सिंग हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या आई गावात राहत होत्या आणि वडील दुसऱ्या शहरात कामाला होते. आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे धीरजला मध्यंतरी गावी जावे लागले. अशा स्थितीत वडिलांची त्यांच्या गावी बदली व्हावी, अशी विनंती त्यांनी अधिकाऱ्यांना केली. मात्र, तेथे त्यांचे कोणीही ऐकले नाही. त्यामुळे त्यानंतर त्यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.
आयएएस धीरज कुमार सिंह यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. यूपीएससी परीक्षेबाबत त्यांनी घरच्यांना सांगितले, तेव्हा सर्वांनी त्याला विरोध केला. पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते. नागरी सेवेसाठी धीरजने दरमहा ५ लाख रुपयांची नोकरीची ऑफरही नाकारली होती. धीरज कुमार सिंगला स्वतःला एकच संधी द्यायची होती. त्यामुळेच त्यांनी ठरवले होते की, पहिल्याच प्रयत्नात ते अपयशी झाले तर ते फक्त मेडिकल प्रॅक्टिस करतील. मात्र, त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि २०१९ च्या UPSC परीक्षेत त्यांनी संपूर्ण देशभरात ६४ वा क्रमांक मिळवा आणि ते IAS अधिकारी बनले. त्यांचा यशस्वी प्रवास हा आजच्या तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी आहे.