सह्याद्रीनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. सुखदेव जाधव व सह्याद्रीनगर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संगिताताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम पार पडणार
देवरूख- संंगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील सह्याद्रीनगर मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात आज रविवारी सकाळी दुर्गादेवीच्या भव्य अशा आगमन मिरवणुकीने मोठ्या उत्साहात झाली आहे. या मंडळाच्या नवरात्रोत्सवातील दुर्गामातेची मुर्ती स्थानापन्न झाली असून या दुर्गामातेची विधीवत पूजाआर्चा करण्यात आली. सह्याद्रीनगर मित्रमंडळातर्फे दि. १५ ते २३ आँक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात दररोज रात्री दांडीया रासनृत्य रंगणार आहे.
सह्याद्रीनगर मित्रमंडळ यावर्षी ३३ वा नवरात्र उत्सव साजरा करत आहे. उत्सवाची सुरुवात देवीच्या भव्य दिव्य अशा सवाद्य मिरवणुकीने झाली आहे. मूर्तिकार आशीष बेलवलकर यांच्या मुर्तीशाळेतून सह्याद्रीनगर तिठा अशी दुर्गादेवीची आगमन मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीचे आंबेशेत येथील नवलाई लाकडी ढोल-ताशा पथक, कांतारा वेशभुषेतील वादक व शिवभैरव पेपर ब्लास्ट हे खास आकर्षण ठरले. त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीत सह्याद्रीनगर मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, परिसरातील नागरिक, लहान मुले, जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
उद्या सोमवारी १६ रोजी सायं.५ वाजता महिलांसाठी फनीगेम्स होणार आहेत. मंगळवारी १७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सौ. संगीता सुखदेव जाधव पुरस्कृत पाककला स्पर्धा होणार आहे. बुधवारी १८ रोजी सायंकाळी ४ वा. हळदीकुंकु समारंभ, दि. १९ व २० रोजी सायंकाळी ६.३० वाजता धमाल आणणारी होममिनिस्टर स्पर्धा रंगणार आहे. दि. २१ रोजी पानाफुलांचा भोंडला, दि. २१ व २२ रोजी. कॅरम स्पर्धा होणार आहे. दि. २२ रोजी रात्री ८ वाजता फॅन्सीड्रेस दांडीया स्पर्धा होणार आहे. दि. २३ रोजी रात्री दुर्गामाता देवीचे मिरवणुकीने विसर्जन होणार आहे. दि. २४ रोजी रात्री १० वा. शक्तीवाले शाहीर श्री. बिनेश वाजे व तुरेवाले शाहीर श्री. अमोल दैत यांचा जाखडीचा डबलबारी जंगी सामना असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
दुर्गादेवीची प्रतिष्ठापना झाल्यावर आता सर्वांनाच वेध लागले ते दांडिया रास आणि विविध स्पर्धांचे, दररोज रात्री ८.३० वाजता मंडळाच्या दांडिया रासाला सुरुवात होणार असून महिलांसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी तसेच महिलांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून व स्पर्धेत सहभाग घ्यावा तसेच सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेवून नवरात्रोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन सह्याद्रीनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुखदेव जाधव आणि सह्याद्रीनगर महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीताताई जाधव यांनी मंडळातर्फे केले आहे.