साडवली सह्याद्रीनगर मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ; आदिशक्ती दुर्गामातेची मुर्ती स्थानापन्न…

Spread the love

सह्याद्रीनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. सुखदेव जाधव व सह्याद्रीनगर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संगिताताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम संपन्न होणार.

जनशक्तीचा दबाव न्यूज | निलेश जाधव | देवरूख | ऑक्टोबर १५, २०२३.

संंगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीनगर मित्रमंडळ, साडवलीच्या सुप्रसिद्ध शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली असून आज रविवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री दुर्गादेवीचे आगमन झाले. यावेळी मंडळाच्या सदस्यांनी व श्रद्धाळू भाविकांनी उत्स्फूर्त मिरवणूक काढून आपल्या आराध्य देवतेचे स्वागत केले. यानंतर श्री दुर्गामातेची मुर्ती स्थानापन्न झाली असून विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. सह्याद्रीनगर मित्रमंडळातर्फे दि. १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. नवरात्रोत्सवात दररोज रात्री गरबा-दांडीया रासनृत्य रंगणार असून यामाध्यमातून आदिशक्तीची सेवा करण्यात येणार आहे.

सह्याद्रीनगर मित्रमंडळ यावर्षी ३३ वा नवरात्र उत्सव साजरा करत आहे. उत्सवाची सुरुवात देवीच्या भव्यदिव्य अशा सवाद्य मिरवणुकीने झाली आहे. मूर्तिकार आशीष बेलवलकर यांच्या मुर्तीशाळेतून सह्याद्रीनगर तिठ्यापर्यंत दुर्गादेवीची आगमन मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीचे आंबेशेत येथील नवलाई लाकडी ढोल-ताशा पथक, कांतारा वेशभुषेतील वादक व शिवभैरव पेपर ब्लास्ट हे खास आकर्षण ठरले. त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सह्याद्रीनगर मित्रमंडळाचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या पदाधिकारी, स्त्री-पुरुष कार्यकर्ते तसेच परिसरातील अबालवृद्ध नागरिक सहभागी झाले होते.

उद्या सोमवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सायं. ०५:०० वा. महिलांसाठी फनीगेम्स होणार आहेत. मंगळवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायं. ०६.३० वा. महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संगीता सुखदेव जाधव पुरस्कृत पाककला स्पर्धा होणार आहेत. बुधवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०४:०० वा. महिलांचा हळदीकुंकु समारंभ, दि. १९ व २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६.३० वा. धमाल आणणारी ‘होम मिनिस्टर स्पर्धा’ रंगणार आहे. दि. २१ ऑक्टोबर रोजी पानाफुलांचा भोंडला तर दि. २१ व २२ ऑक्टोबर रोजी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दि. २२ ऑक्टोबर रोजी रात्री ०८:०० वाजता ‘फॅन्सी ड्रेस दांडीया’ स्पर्धा होणार आहे. दि. २३ ऑक्टोबर रोजी दुर्गामाता देवीचे मिरवणुकीने विसर्जन होणार आहे. दि. २४ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०० वा. शक्तीवाले शाहीर श्री. बिनेश वाजे व तुरेवाले शाहीर श्री. अमोल दैत यांचा जाखडीचा डबलबारी जंगी सामना रंगणार आहे. अशा प्रकारे या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्व श्रद्धाळू भाविकांना मंडळाच्या वतीने पर्वणी आहे.

तरुणाईला गरबा-दांडिया रास आणि विविध स्पर्धांचे वेध लागले असून दररोज रात्री ०८.३० वा. मंडळाच्या दांडिया रासाला सुरुवात होणार आहे. याच दरम्यान उपस्थित माता-भगिनींसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. मातृशक्तीच्या या उत्सवासाठी परिसरातील आणि दशक्रोशीतील महिलांनी तसेच अन्य नागरिकांनी सहभागी होऊन देवीची आराधना करावी व नवरात्रोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन सह्याद्रीनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. सुखदेव जाधव आणि सह्याद्रीनगर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संगीताताई जाधव यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page