
रत्नागिरी जिल्ह्यातील इतर गावांसाठी निर्माण केला आदर्श…
सावर्डे: सोनल खाडे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील मौजे दहिवली बुद्रुक ग्रामपंचायत यांच्या मासिक सभा दि. १४/०९/२०२३ व महात्मा गांधी तंटामुक्त समिती दहिवली बुद्रुक यांची मासिक सभा दि. ३/१०/२०२३ रोजी झालेल्या या दोन्ही सभांमध्ये दहिवली बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये कायमस्वरूपी दारूबंदी एकमुखी ठराव करण्यात आला. या सभांना गावातील अवैध दारूविक्री , हातभट्टी दारु व्यवसायिकांना बोलवून त्यांनाही याची कल्पना देण्यात आली. त्यांनीही गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले असून गुरुवार दि. १२/१० /२०२३ पासून दहिवली बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये कायमस्वरूपी दारूबंदी करण्याचे ठरविण्यात आले.
या ठरावाची अंमलबजावणी म्हणून गावच्या सरपंच मा. कल्पना शशिकांत घाग , तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री. महेश वसंतराव घाग व ग्रा.पं. सदस्य मा.श्री. रुपेश रविंद्र घाग व सर्व ग्रा.पं. सदस्य , तसेच तंटामुक्त समितीचे सर्व सदस्य यांनी एक निवेदन तयार करून सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. गायकवाड साहेब यांना पाठविले आहे. तसेच गावामध्ये अवैध दारूविक्री व्यवसाय व हातभट्टी व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना वैयक्तिक नोटीस पाठवून गुरुवार दि.१२/१०/२०२३ पासून अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कळविले आहे.

दि. १२/०१०/२०२३ नंतर दहिवली बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये अवैध दारू विक्री व्यवसाय करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल व कोणाचीही हय-गय केली जाणार नाही. असे आश्वासन सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मा.गायकवाड साहेब यांनी दिले.
दारूमुळे गावात घरगुती हिंसाचार तसेच महिलांचे संसार उघड्यावर पडण्याची भिती दहिवली गावात निर्माण झालेली आहे. आजची नवतरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून, मध्यप्राशनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत., गावात चोऱ्या , घरफोड्या करण्याचे प्रमाण वाढले आहे., दारुड्यांपासून गावात लहान मुले, तरुणी / युवती , महिला तसेच वयोवृद्ध माणसे यांना कामानिमित्त बाहेर पडणे त्रासदायक झाले आहे.
याबाबतीत गावातील महिलांच्या व ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी देखील ग्रामपंचायत व तंटामुक्ती दहिवली बुद्रुक यांच्याकडे येत आहेत तसेच दारूच्या व्यसनापासून भावी पिढी दूर राहावी अशी सर्व ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली आहे.

गावातील ग्रामस्थ व महिला यांच्या मागणीनुसार दहिवली बुद्रुक गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. महेश वसंतराव घाग यांनी दहिवली बुद्रुक गावामध्ये कायमस्वरूपी दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत दहिवली बुद्रुक यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे.
अवैध दारु-धंदे मुक्त गाव संकल्पना राबविण्याचा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील इतर गावांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
या धाडसी निर्णयाबद्दल तंटामुक्ती अध्यक्ष श्री. महेश वसंतराव घाग, सरपंच सौ. कल्पना शशिकांत घाग व माजी सरपंच/ग्रा.पं. सदस्य श्री. रुपेश रविंद्र घाग, श्री.उदय घाग, श्री.दिगंबर मनोहर घाग आणी तंटा मुक्ती गाव पॅनल सदस्यांचे ग्रामस्थांकडून व समाजातील सर्वंच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे….
जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात
