पुणे : पुण्यातील आंबेगाव तालुक्यात शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अवसरी खुर्द गावाच्या परिसरात असणाऱ्या तांबडे मळा येथे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अंगावर काही अज्ञात व्यक्तींनी स्प्रे मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काल बुधवारी देखील असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या तोंडावर चार जणांच्या टोळीने स्प्रे मारला. मात्र, तिच्यासोबत काही करण्याच्या आत तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी आरडाओरडा केल्याने त्या अज्ञातांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. हा स्प्रे मारल्याने अंगावर खाज येऊन सूज येण्याचे प्रकार समोर येत आहेत. कोयता गँगनंतर आता या स्प्रे गँगने धुमाकळ घातलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, अवसरी येथील श्री. भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही घटना घडली आहे. शनिवार दि. ७ रोजी वेदांत सचिन भोर (वय ११) हा इयत्ता ५वीत शिकणारा मुलगा शाळेत जात असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी मुलाच्या हातावर स्प्रे मारत निघून गेले होते. तर दि. ११ रोजी प्रणाली अजय तांबडे (वय १४) या इयत्ता ८ वीत शिकणारी विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीबरोबर शाळेत येत असताना दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांपैकी एका दुचाकीवरील व्यक्तीने तिच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यावेळी तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीने आरडाओरडा केला असता ते दुचाकीवर निघून गेले. हा स्प्रे मारल्यानंतर शरीराला खाज येऊन सूज येण्याचे प्रकार घडत असल्याचे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सांगण्यात येत आहे.