
नवीदिल्ली- अफगाणिस्तान विरूद्धच्या आजच्या विजयी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली आहे. दिल्लीच्या मैदानावर रोहित शर्माच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. रोहित शर्माने अवघ्या ६३ चेंडूत शतक ठोकले. रोहित शर्माने आपल्या खेळीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यापैकी एक विक्रम म्हणजे, रोहित शर्मा भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.
१) सर्वात आधी रोहितने भारतीय डावाच्या पाचव्या ओव्हरमध्ये वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगाने १ हजार धावा करण्याचा विक्रम केला. याबाबत त्याने सचिनला मागे टाकले. सचिनने २० डावात ही कामगिरी केली होती. तर रोहितने १९ डावात १ हजार धावा केल्या. याबाबत आता तो डेव्हिड वॉर्नरसह संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे.
२) वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले
सचिन तेंडुलकर- २ हजार २७८ धावा
विराट कोहली- १ हजार ११५ धावा
रोहित शर्मा- १ हजार ९ धावा
३) रोहितने आठव्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार मारला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. याबाबत त्याने ख्रिस गेलला मागे टाकले.
४) १८ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली आणि शतक पूर्ण केले. वनडेतील हे त्याचे ३१ वे शतक ठरले. यासाठी त्याने फक्त ६३ चेंडू घेतले. वर्ल्डकपच्या इतिहासातील हे भारताकडून झालेलं सर्वात वेगवान शतक आहे. रोहितने ४० वर्षापूर्वी कपिल देव यांनी केलेला विक्रम मोडला. इतक नाही तर वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम रोहितने स्वत:च्या नावावर केला. त्याने सचिनच्या ६ शतकांचा विक्रम मागे टाकला.
५) वनडेत सर्वाधिक शतक करणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर- ४९
विराट कोहली- ४७
रोहित शर्मा- ३१
रिकी पॉन्टिंग- ३०
६) वनडेत सर्वात वेगवान शतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे.
विराट कोहली- ५२ चेंडूत शतक
विरेंद्र सेहवाग- ६० चेंडूत शतक
विराट कोहली- ६१ चेंडूत शतक
मोहम्मद अझरूद्दीन- ६२ चेंडूत शतक
रोहित शर्मा- ६३ चेंडूत शतक
७) वर्ल्डकपमधील वेगवान शतकाबाबत रोहित सहाव्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे इयान मॉर्गन (५७ चेंडूत शतक), एबी डिव्हिलियर्स (५२ चेंडूत), ग्लेन मॅक्सवेल (५१ चेंडूत), केव्हिन ओ ब्रायन (५० चेंडूत) एडन मार्कराम (४९ चेंडूत) हे खेळाडू आहेत.
८) वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने सलामीला येत २९ वेळा शतक केले आहे. या यादीत सचिन तेंडुलकर ४५ शतकांसह अव्वल स्थानी आहे. आज रोहितने लंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले.
९) रोहित-ईशान यांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागिदारी केली. वर्ल्डकपमधील भारतासाठीची ही पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम भागिदारी ठरली. पहिल्या स्थानावर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची १८९ धावांची भागिदारी आहे.
१०) रोहित-ईशान यांनी ११२ चेंडूत १५६ धावा केल्या. त्यांचा रनरेट ८.३५ इतका होता. वनडे क्रिकेटमधील ही पाचव्या क्रमांकाची १५० हून अधिक धावांची भागिदारी ठरली आहे. या यादीत जॉनी ब्रेस्टो आणि जेसन रॉय ही अव्वल स्थानी आहेत. त्यांनी ९.०८ च्या रनरेटने २०१९ साली धावा केल्या होत्या.
