मा. राज्यसभा खासदार श्री. शरद पवार साहेबांची हयात गेली राजकीय कलागती करण्यात. ज्या सोनिया गांधींना ‘विदेशी’ संबोधून वेगळा संसार थाटला पुढे त्यांच्यासमोर ‘घालीन लोटांगण’चा केलेला प्रयोग त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरवशाली टप्पा आहे. गोपीनाथ मुंढे साहेबांचे घर फोडणारे, शिवसेना तोडणारे, आपलेच राजकीय गुरु वसंतराव पाटील साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे जेव्हा लोकशाहीच्या गप्पा मारायचे तेव्हा खरेतर हास्यास्पद वाटायचे. पण राजकीय मर्यादांचे उल्लंघन टाळण्यासाठी बोलण्याचे अनेकांनी अनेक वेळा टाळले.
अजितदादांनी ना. एकनाथजी शिंदे साहेब व ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांची साथ देण्याचा मुत्सद्दी निर्णय घेतला. जवळपास ७०% आमदार व कार्यकर्ते आज त्यांच्यासोबत आहेत. त्याबाबत मा. न्यायालयात त्यांनी प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचे समजते. आज त्यांची बाजू मांडताना वकील ज्यावेळी शरद पवार साहेबांना ‘हुकूमशहा’ म्हणत होते; ही गोष्ट संपूर्ण देशाने पाहिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, खासदार सुप्रिया सुळे जे मा. मोदीजींना उद्देशून म्हणायच्या आज तेच त्यांच्याच पिताश्रींना त्यांच्याच लोकांकडून ऐकून घ्यावे लागत आहे. सत्य कधीतरी उघड होतेच, याबाबत त्यांना आता प्रचीती आली असेलच.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा प्रदान करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या राजकीय भविष्याची सूत्रे पक्षाच्या हाती सोपवली असल्याने पक्षादेश शिरोधार्य मानण्याची पद्धत आहे. दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी पक्षाचा आदेश अंतिम मानून उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे भाजपामध्ये हुकुमशाही आहे हे बोलणाऱ्या इंडि आघाडीच्या लोकांनी आत्मचिंतन करावे एवढी माफक अपेक्षा. तूर्तास एक्क्याने ‘हुकूम’शहाचा पर्दाफाश केला असेच म्हणावे लागेल.