मुंबई ,27 सप्टेंबर- भारतीय जनता पक्षाने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विधानसभा संयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संयोजकांना काय करावे व काय करू नये याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यांना एक निश्चित टार्गेटही देण्यात आले आहे. त्यांनी ते पूर्ण केले किवा नाही याचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.
देशात लोकसभा व विधानसभेचे रणशिंग कोणत्याही वेळी फुंकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष अंग झटकून कामाला लागले आहेत. सत्ताधारी भाजपनेही महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभेच्या अधिकाधिक जागा जिंकण्याची रणनीती आखली आहे. त्यानुसार, त्यांनी जिल्हा पातळीवर एक समिती स्थापन केली आहे. भाजप या समितीच्या माध्यमातून तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने या विधानसभा संयोजकांना मतदार संघात काटेकोर नियोजन करण्याची सूचना केली आहे. पक्षाने पुणे जिल्ह्यातही विधानसभा संयोजकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर त्यांना निवडणुकीचा कार्यक्रम दिला जाईल. विशेष म्हणजे भाजपने विधानसभेच्या माध्यमातून लोकसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघ पिंजून काढणे म्हणजे लोकसभा मतदार संघच पिंजून काढण्यासारखे आहे. त्यामुळे भाजपने छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या देऊन आपले उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न चालवला आहे.