
दिवा: गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची दिवा रेल्वे स्थानकात शनिवारी मोठी गर्दी उसळली. आज, रविवारी ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवा येथून सावंतवाडी, रत्नागिरीला जाणाऱ्या रेल्वे गाडीत प्रवेश मिळावा, यासाठी प्रवासी एक दिवस आधीच स्थानकात येऊन ठाण मांडून बसत आहेत.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी प्रवासी तीन ते चार महिने आधीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करतात. प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे गाडय़ांच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे अनेकांचे आरक्षण होत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी दिवा पॅसेंजर रेल्वे गाडय़ांनी कोकणचा प्रवास करतात. यामुळे मोठी गर्दी असते. प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा मिळत नाही. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी यंदा पॅसेंजरसह दोन विशेष मेमू रेल्वे गाडय़ांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यामुळे सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर, सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी दिवा-रत्नागिरी विशेष मेमू, सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर आणि सायंकाळी ७.४५ मिनिटांनी दिवा-चिपळूण विशेष मेमू रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. या रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी उसळत आहे. प्रवाशांना डब्यात जागा शिल्लक नसते. यामुळे सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी आणि ७ वाजून १० मिनिटांनी दिवा येथून सावंतवाडी आणि रत्नागिरीच्या दिशेने सुटणाऱ्या रेल्वे गाडीत बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी काही प्रवासी आदल्या दिवशी रात्रीपासूनच दिवा स्थानकात येतात.
जाहिरात

