पुणे – राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यात पहाटे पासून तर विदर्भात आणि मराठवाड्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पाऊस असल्याने बळीराजा सुखावला आहे.
राज्यावर आज हवामानाच्या तीन स्थिती सक्रिय आहेत. वाऱ्याची चक्रीय स्थिती ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगडवर प्रभावी आहे. मॉन्सूनची द्रोनिका स्थिती दक्षिणेकडे असून इंदोर आणि बैतूल वरून जात आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा हा १९ डिग्री उत्तरेकडे तयार झाला आहे. तसेच अरबी समुद्राकडून येणारे पश्चिमी वारे तीव्र आहेत. त्यामुळे राज्यात बऱ्याच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकण, गोवा, मुंबई, पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील ४८ तासात पाऊस तीव्र किंवा अतितीव्र पद्धतीने सक्रिय होणार आहे. तर राज्याच्या संपूर्ण विभागात विजांच्या कडकडाट आणि मेघवर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. ९ आणि १० तारखेनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
पुढील ४८ तासांत कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच राज्यात ९ आणि १० तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पुढील ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज वातावर ढगाळ राहणार असून अधून मधून पावसाच्या तीव्र सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ आणि १० तारखेला पावसाचा जोर कमी होणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.