जनशक्तीचा दबाव | मुंबई | फेब्रवारी ०२, २०२३.
एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा (MPSC) नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. थोड्याच वेळात याबाबत अधिकृत घोषणा होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आहे.
सरकारच्या या निर्णयानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. “विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे. आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळीसारखा आहे. या निर्णयासाठी सरकारचे आभार मानतो. आता जोमाने अभ्यासाला लागू,” अशी प्रतिकिया आंदोलक विद्यार्थ्यांनी दिली. यासोबतच आंदोलनात सहभागी झालेले आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार तसंच या मागणीचा पाठपुरावा करणारे आमदार रोहित पवार यांनी देखील सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.