“एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप करतात. मग…”, असेही नारायण राणेंनी म्हटलं.
मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. आता नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला २५ लाख रूपये द्यायचा. तसेच, सहारांकडून उद्धव ठाकरेंनी ७ कोटी रूपये घेतल्याचा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
खासदार गजानन कीर्तिकर यांच्या ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नारायण राणे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार गजानन कीर्तिकर, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, “माझं तोंड उद्धव ठाकरेंनी उघडायला लावू नये. अन्यथा ‘मातोश्री’चा दरवाजा उघडणार नाही. एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला २५ लाख रूपये द्यायचा.”
“सहारांकडून ७ कोटी उद्धव ठाकरेंनी घेतले”
“सुब्रत सहारा यांनी एक हॉटेल विकत घेतलं. तेथील पहिल्या कामगारांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मग, हॉटेलमधील १४० मराठी कामगारांना कामावरून काढायचं कसं हा प्रश्न पडला. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना हॉटेलमध्ये दगडफेक करण्यात सांगितलं. नंतर उद्धव ठाकरेंकडे तडजोड झाली. एक कामगारामागे ४ लाख रूपये याप्रमाणे ७ कोटी रुपये उद्धव ठाकरेंनी घेतले. त्यामुळे १४० कामगार बेकार झाले,” असं नाराय राणे यांनी सांगितलं.
“आम्ही काय दिलं, याची डायरी लिहिली आहे”
“एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप करतात. मग, तुम्हाला आम्ही काय बोके दिले का? खोकेच दिले ना. उद्धव ठाकरेंनी नाही म्हणावं, मग मी दिवस सांगतो. आम्ही सुद्धा कुठल्या दिवशी काय दिलं, कोणत्या गेटने आत गेलो, याची डायरी लिहिली आहे. आम्ही ‘मातोश्री’वर असताना संजय दत्त बॅग घेऊन कुठल्या गेटने आत आला होता, हे सुद्धा माहिती आहे,” असा दावाही नारायण राणेंनी केला आहे.