जिल्हयात रत्नागिरी, चिपळूण शहरातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी 150 कोटी मंजूर
रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहासाठी 10 कोटी तर खेडमधील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी साडेतीन कोटीची तरतूद
रत्नागिरीतील विमानतळावर येत्या काही दिवसात नाईट लँडींगची सुविधा सुरु होणार, वर्षभरात प्रवासी विमान सेवा सुरू होईल
रत्नागिरीला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प -पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी (प्रतिनिधी) कोकणातील सर्वात मोठी शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराजांचा उंच पुतळा, ३ डी मल्टीमीडिया इव्हेंट थिबा पॅलेस परिसरात उभारण्यात येणार आहे. शासनाने त्यासाठी 300 कोटींची तरतूद केली आहे. जिल्हयातील रत्नागिरी, चिपळूण अशा शहरातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी 150 कोटी मंजूर केले आहेत. रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहासाठी 10 कोटी तसेच खेड मधील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी साडेतीन कोटी, विभागीय क्रीडा संकुलासाठी 20 कोटी तरतूद करण्यात आली आहे. विमानतळ जमिनीच्या भूसंपादनासाठी 100 कोटी तरतूद केली असून, येत्या काही दिवसात नाईट लँडींगची सुविधा सुरु होणार आहे. वर्षभरात विमानसेवा सुरु होईल अशी ग्वाही देऊन रत्नागिरीला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प केल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.*
येथील पोलीस परेड ग्राऊंडवर पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हावासियांना सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, स्वातंत्र्य लढयात ज्यांनी योगदान दिले आणि त्यातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले, अशा सर्व ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना याप्रसंगी मी अभिवादन करतो. मागील महिन्यात काही दिवस पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने याची पूर्व तयारी चांगल्या रितीने केली होती. एनडीआरएफचे पथक देखील तैनात होते. अशा संकटकालीन परिस्थितीत प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी, पोलीस, पत्रकार, सेवाभावी संस्था यांनी अहोरात्र काम केले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या जिल्हावासियांचेही मी आभार मानतो.
“देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी जिल्ह्यात 9 ऑगस्ट या क्रांतीदिनापासून ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील एकमेव रत्नागिरी जिल्हा आहे की, तहसील कार्यालयात सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहेत. लवकरच जिल्हयाच्या मुख्यालयातही सर्वात उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकविण्यात येईल. जिल्हयातील विकास कामांसाठी यापूर्वी असणाऱ्या 240 कोटींमध्ये शासनाने 60 कोटी रुपयांची वाढ करुन तो 300 कोटी रुपये इतका केला आहे.
“शासन आपल्या दारी” हा उपक्रमामध्ये आतापर्यंत सर्व विभागाच्या योजनांचा लाभ 1 लाख 62 हजार 845 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. जिल्हयामध्ये जीएनएम, एएनएम, संस्कृत विद्यापीठ, 250 कोटी खर्च करुन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाले आहे. 522 कोटी खर्चून वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. त्याचबरोबर स्किल सेंटर सुरु झाले आहे. रत्नागिरी शैक्षणिक केंद्र म्हणून नावारुपास येत आहे. येत्या दोन महिन्यात विधी महाविद्यालय देखील सुरु करणार आहोत. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे पालकमंत्री म्हणाले.
अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळामार्फत आजपर्यंत लाभार्थ्यांना व लाभार्थी गटांना एकूण 30 कोटी 90 लाख 10 हजार 273 एवढ्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला ज्यांनी दिशा दिली त्या श्यामराव पेजेंचे नाव अभियांत्रिकी महाविद्यालयाला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विमानतळ धावपट्टीसाठी 140 कोटींचा खर्च झाला आहे. जमिनीच्या भूसंपादनासाठी 100 कोटींची तरतूद केली असून, येत्या काही दिवसात नाईट लँडीगची सुविधा सुरु होणार आहे. वर्षभरात विमानसेवा सुरु होईल. कोकणातील 12 रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभिकरण करणे या कामाचे भूमिपुजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाचा व्यापक विस्तार होण्यासाठी निश्चितच लाभ होईल.