रत्नागिरी (प्रतिनिधी): दरवर्षी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणादिवशी, १ मे महाराष्ट्र दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. शालेय विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात. परंतु, हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार रस्त्यावर इतरत्र पडलेल्या, खराब झालेल्या व फाटलेल्या ध्वजांचे संकलन करुन राष्ट्रध्वज संहितेमध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषदस्तरावर समित्या स्थापन करण्यात येत आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर- अध्यक्ष- ग्रामसेवक, सदस्य – गावातील शाळांचे मुख्याध्यापक, गावातील पोलीस पाटील, नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर- अध्यक्ष- मुख्याधिकारी, सदस्य- नगरातील शाळांचे मुख्याध्यापक, संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा त्यांचा प्रतिनिधी याप्रमाणे समित्या स्थापन करुन त्या कार्यान्वीत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्याधिकारी, नगरपालिका यांना कळविण्यात आले आहे.
दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी व त्यानंतर कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत. राष्ट्रध्वज इतरत्र टाकू नयेत. राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा. तसेच सर्व नागरिक, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था यासंदर्भात नेमण्यात आलेल्या शासकीय समित्या यांनीही इतरत्र पडलेले, खराब झालेले व फाटलेले राष्ट्रध्वज संकलित करावेत तसेच कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने स्वतःहून गोळा केलेले राष्ट्रध्वज शासकीय समित्यांकडे द्यावेत. या समित्यांनी ते स्वीकारुन खराब व फाटलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नेमण्यात आलेल्या समित्यांनी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले आहे.