कोट्यवधींचा खर्च, मात्र अपघात रोखण्यात अपयश
▶️खेड,09 ऑगस्ट- महामार्गाच्या चौपदरीकरणात रस्त्यांचे दोष शोधताना भोस्ते घाटातील ‘या अवघड वळणावर’ असंख्य स्पीड ब्रेकर घातले, टायर भिंतीवर बांधून पाहीले, नाना पध्दतीने वापरुन झाल्या असून अपघातांची मालिका थांबतच नाहीत.
काही दिवसांपूर्वी मासे पकडण्यासाठीचे जाळे घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. दोन्ही वाहणे दरीत कोसळून २ ठार तर ३ जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहतूक दीड ते दोन तास बंद होती. त्यानंतर लोटे येथून घनकचरा घेऊन जाणारा ट्रक अपघातग्रस्त झाला. परिसरात पावसाच्या पाण्याबरोबर घातक रसायने वाहून गेली. या घाटाच्या पायथ्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत दुचाकीसह अनेक वाहनांना दररोज अपघात होतात. भोस्ते घाटात असंख्य अपघात होऊन मरण पावलेल्यांची संख्या फार मोठी आहे तर, जायबंदी झालेले काही कमी नाहीत. अपघातांची मालिका आजही सुरुच आहे.
चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते शौकत मुकादम यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर ठेकेदार आणि महामार्ग विभागाचे अधिकारी यांनी भोस्ते घाटाची पाहाणी केली. रस्त्यावर विशिष्ट पद्धतीचे बदल घडवून आणले पाहिजेत, असे सूचित केले आहे. परंतु, घाटात काहीबाई करुनही अपघात काही केल्या थांबत नाहीत ही मालिका आणखीन किती दिवस पुढे चालत राहणार आहे? याला जबाबदार कोण? प्रवास करणारी जनता की, महामार्ग विभागाचे अधिकारी? हे केंद्रीय पथकाने शोधून काढायला हवे!