देशात वाहतुकीसाठी रेल्वे हे नागरिकांच्या पसंतीचे साधन आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधानांनी अमृत भारत स्टेशन योजनेचं लोकार्पण केलं. रेल्वे मंत्रालयाने देशातील १ हजार ३०० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमृत भारत’ या योजनेअंतर्गत टप्प्या-टप्प्याने देशातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ ऑगस्ट) ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विकासित देशाच्या ध्येयाकडे आपला देश वेगाने वाटचाल करत आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातही एक नवा अध्याय आजपासून सुरू होत आहे. भारतातील सुमारे १३०० प्रमुख रेल्वेस्थानकं आता अमृत भारत रेल्वे स्थानकं म्हणून विकसित केली जातील.
पंप्रधान मोदींनी सांगितलं की या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ४,५०० कोटी रुपये खर्च करून तब्बल ५५ रेल्वेस्थानकं विकसित केली जातील. तर राजस्थानमध्ये देखील ५५ रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाईल. भारतीय रेल्वेत जितकं काम केलं जातंय ते पाहून आनंद आणि आश्चर्य वाटतंय. भारतीय रेल्वेने दक्षिण आफ्रिका, युक्रेन, पोलंड, युनायटेड किंगडम, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि स्वीडनसारख्या देशांपेक्षा अधिक वेगाने गेल्या नऊ वर्षात कामं केली आहेत. या देशांपेक्षा आपल्या देशात जास्त रेल्वे रूळ टाकले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची पायाभरणी केली. याअंतर्गत आंध्र प्रदेशातील १८, आसाममधील ३२, बिहारमधील ५०, छत्तीसगडमधील ७, नवी दिल्लीतील ३, झारखंडमधील २०, कर्नाटकातील १३, केरळमधील ५, मध्य प्रदेशमधील ३४, महाराष्ट्रातील ४४, मेघालयमधील १, नागालँडमधील १, ओडिशातील २५, पंजाबमधील २२, राजस्थानमधील ५५, तामिळनाडूतील १८, तेलंगणातील २१, त्रिपूरातील ३, जम्मू-काश्मीरमधील ५, पुडुचेरीमधील १, उत्तर प्रदेशातील ५५, उत्तराखंडमधील ३, पश्चिम बंगालमधील ३७ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे.