मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून मनसेचा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींना टोला

Spread the love

मुंबई- गेल्या अनेक वर्षंपासून महाराष्ट्रातल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलं आहे. या महामार्गाचं आतापर्यंत जे काम झालंय त्याची परिस्थितीही भीषण आहे. त्यामुळे खाचखळग्यातून मार्गक्रमण करत वाहनचालक आणि कोकणवासियांचा खडतर प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांची परिस्थिती फारशी वेगळी नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झाला नाही.

आतापर्यंत ज्या-ज्या पक्षाचं सरकार स्थापन झालं, त्या प्रत्येक सरकारला मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून विरोधकांनी अनेकदा धारेवर धरलं आहे. सध्या राज्यात भाजपा-शिंदे गटाचं सरकार आहे. तर गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रात भाजपाचं सरकार आहे. त्यामुळे या सरकारमधील मंत्र्याना यावरून अनेकदा प्रश्न विचारले गेले. परंतु कोणताही नेता यावर तोडगा काढू शकला नाही.

मुंबई गोवा महामार्गाच्या दूरवस्थेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे अनेकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राज ठाकरे कोकणात जेव्हा-जेव्हा सभा घेतात, तेव्हा-तेव्हा या महामार्गाचा प्रश्न उपस्थित करतात. दरम्यान, आता मनसेने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ शेअर करत दोघांवर टीका केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाबाबत विचारलेल्या प्रश्नावर गडकरी यांनी लोकसभेत आणि फडणवीस यांनी विधान परिषदेत उत्तर दिलं आहे. या उत्तरात दोन्ही नेत्यांनी त्यांची हतबलता व्यक्त केली आहे.

या व्हिडीओमध्ये नितीन गडकरी म्हणाले आहेत की, मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर देताना माझ्या मनात अपराधीपणाची भावना येतेय. देशात मुंबई-गोवा या मार्गावर पुस्तक लिहिता येईल. या महामार्गाचं काम रखडल्याबद्दल माझ्याकडे उत्तर नाही.

दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, या महामार्गाच्या कामात अनेक अडचणी येत आहेत, कधी कायदेशीर, कधी कंत्राटदाराच्या अडचणी येतात. यामुळे राज्य सरकारसमोर अडचणीची स्थिती निर्माण होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा यासाठी खूप प्रयत्न केले. गडकरी यांनी देशभरात रेकॉर्डब्रेक वेगाने रस्ते बांधले, परंतु, या रस्त्याच्या कामात मात्र अनेक अडचणी येत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page