श्रीहरीकोटा- चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत आज सायंकाळी ७.१५ वा. यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. इस्रोने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. आता ६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता चांद्रयानाचे ऑर्बिट कमी केले जाईल. चंद्राच्या भूमीवर उतरण्याआधी एकूण ४ वेळा चांद्रयानचे ऑर्बिट बदलले जाईल.
दि. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल. १ ऑगस्टच्या सुरुवातीला, अंतराळ यानाने ट्रान्स-लूनर इंजेक्शनद्वारे 288 किमी बाय 3.7 लाख किमीची कक्षा गाठली आणि चंद्राच्या प्रभावाच्या क्षेत्रात प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाल्यानंतर आता चांद्रयान-3 हे चंद्राभोवती एक फेरी मारेल. तसेच 6 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास चांद्रयानाला चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत ढकलण्यात येईल. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी तिसऱ्या, 14 ऑगस्टला चौथ्या आणि 16 ऑगस्टला पाचव्या कक्षेत ढकलण्यात येईल.
दरम्यान, चंद्रयान 3 ने 14 जुलै रोजी दुपारी २.३५ मिनिटांनी आवकाशात झेपावलं होतं. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यान प्रक्षेपित करण्यात आलं होतं. चांद्रयान-३ 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरल्यानंतर त्याचं खरं काम सुरु होईल. हे यान इस्रोमध्ये बसलेल्या वैज्ञानिकांना चंद्राबद्दल माहिती पाठवेल. त्याचबरोबर पाण्याचीही माहिती समोर येणार आहे. चांद्रयान-3 मोहिमेचे तीन प्रमुख मुद्दे आहेत. ‘प्रपल्शन, लँडर, रोव्हर’. या मोहिमेचा एकूण खर्च 600 कोटी रुपये इतका झाला आहे. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या विभागातील शेकडो वैज्ञानिकांनी सहभाग नोंदवला आहे.
इस्रोची ही मोहिम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर चंद्राच्या भूमीवर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरले. चंद्राच्या भूमीवर अवघड अशी सॉफ्ट लँडिंग करण्याचे कौशल्य मिळवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल. चांद्रयान-२ मोहिमेत इस्रोला सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले होते. तेव्हा ७ सप्टेंबर २०२९ रोजी विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगच्या वेळी ब्रेकिंग प्रणालीत झालेल्या गडबडीमुळे चंद्राच्या भूमीवर क्रॅश झाले होते. इस्रोने २००८ साली चांद्रयान-१ मोहिम सुरु केली होती. गेल्या १५ वर्षातील भारताची ही तिसरी चंद्र मोहिम आहे.