
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने आराम घेतलाय. सलग दोन आठवडे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोसळल्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. पण आता पाऊस पुन्हा कोसळणार आहे. राज्यात पुन्हा पावसाचं आगमन होणार आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्यामुळे महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधात पावसाची शक्यता आहे.

जुलै महिन्यात शेवटच्या दोन आठवड्यात चांगला पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडला. याशिवाय पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. पालघर जिल्ह्यातील वसई-विरार, नालासोपारा येथे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. तसेच मुंबईतही तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडला. पण दोन दिवसांपासून पावसाने आराम घेतला आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस कधी पोहोचेल? अशी चिंता व्यक्त केली जात होती. हवामान विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.