खेड ; खेड तालुक्यातील लोटे येथील औद्योगिक वसाहतीला सोसावा लागणारा त्रास कदाचित औद्योगिक विकास महामंडळाला दिसत नसावा म्हणूनच की काय मागील दोन वर्षांपासूनची रस्त्याची समस्या अद्यापही ”जैसे थे” आहे. त्यामुळे एमआयडीसी सुस्त आणि औद्योगिक वसाहत त्रस्त अशीच स्थिती झाली आहे.
लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीत अनेक समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत. वसाहतीतील रस्ते, वीज आणि पाणी या प्रमुख गरजांकडे एमआयडीसीचे म्हणावे तितके लक्ष नसल्याचे जाणीवपूर्वक दिसत आहे. वसाहत परिसरातील संपूर्ण अंतर्गत रस्ते दयनीय झाले आहेत. संपूर्ण परिसरात प्रत्येक कारखान्यासमोरचा रस्ता खोदलेल्या अवस्थेत आहे. ठिकठिकाणी खड्डे असून, काही ठिकाणी रस्ताच नसल्याचे चित्र आहे. मुंबई-गोवा महामार्गलगत आवाशी-गुणदेफाटा येथील एमको पेस्टीसाइड कंपनी ते डॉर्फ केटल कंपनीपर्यंतचा रस्ता मागील दोन वर्षांपासून पाण्याखाली आहे. या मार्गावर एमको, इंडियन ऑक्सलेट, डॉर्फ केटल या तीन कंपन्या आहेत. यूएसव्ही कंपनीच्या संरक्षक भिंतीलगत जाणारा पूर्वेकडचा रस्ता अनेक कंपन्यांना जोडणारा आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शंभर मीटर अंतरात या रस्त्यावर जवळपास पाच फूट इतके पाणी आहे. याचा त्रास वाहनचालकांना तर होतोच परिणामी रात्रीच्यावेळी कामावर येणाऱ्या व कामावरून जाणाऱ्या कामगारांनाही होत आहे