अजून बऱ्याच विकेट काढायच्या आहेत; एकनाथ शिंदेंच्या विधानाने तर्कवितर्कांना ऊत

Spread the love

ठाणे : मी मुख्यमंत्री असलो तरी तुमच्यातील एक आहे, त्यामुळे रस्त्यावर उतरून जनतेची कामे करीत आहे. मात्र, घरात बसून जनतेची कामे होत नाहीत, कोविड काळात तर आपले परके झाले होते, भेट देण्यासही तयार नव्हते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. आता बऱ्याच जणांच्या विकेट अजून काढायच्या आहेत, असेही ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रोख जुन्या विरोधकांकडे की नव्या स्पर्धकांकडे अशी चर्चा सुरू झाली आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यातील आनंद आश्रमात शिंदे यांनी आपल्या आमदारांसह बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गुरुपौर्णिमा साजरी केली. तसेच यावेळी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला, यावेळी ते बोलत होते. २०१९ मध्ये युतीचेच सरकार येणार होते. मात्र, काहींना सत्तेचा आणि खुर्चीचा मोह आवरला नाही, त्यामुळे ते सरकार येऊ शकले नाही. घरात किंवा कार्यालयात बसून जनतेची कामे होत नाहीत. आता खऱ्या अर्थाने युतीचे सरकार आले असून लोकहिताची कामे केली जात आहेत. आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायचे आहे. कलाकारांनी कलाकारांसाठी कामे केले पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नका, अशी सूचना त्यांनी केली.


राज्याच्या मंत्रिमंडळात अजून १३ जागा भरायच्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतील, अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राष्ट्रवादी मंत्र्यांच्या शपथविधीमुळे शिवसेना आमदारांमध्ये नाराजी नसल्याचा दावा देसाई यांनी केला. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आठ दिवसांत विस्तार होईल, असे आनंदाश्रम येथे पत्रकारांना सांगितले.
येत्या ९ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यात शिंदे गटाला पाच तर भाजपला आठ मंत्रिपदे प्राप्त होतील, असे समजते. अजित पवार यांच्या रूपाने लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मंत्री देसाई म्हणाले, हा पोपट गेले वर्षभर चुकीची चिठ्ठी काढतो. या पोपटाची एकही चिठ्ठी खरी निघाली नाही. या पोपटाचे तुम्ही ऐकू नका.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page