चिपळूण :: “माझं शिक्षण मला फारसं भावत नाही. माझं खरं शिक्षण मी डॉक्टर झाल्यानंतर झालेलं आहे. वैद्यकीय शिक्षणानंतर समाजात वावरत असताना मला जे ज्ञान मिळालं त्यातून आजचा ‘मी’ घडलेलो आहे” अशी आग्रही भूमिका मांडणाऱ्या वैद्यकीय व्यवस्थापन शास्त्रतज्ज्ञ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. श्रीधर ठाकूर यांना चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. ठाकूर हे मागील तीन दशकांहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ते जागतिक संदर्भ असलेल्या ‘उत्कृष्ट बॉटनिकल गार्डन’चे निर्माते आणि संग्राहक आहेत. अनेक आव्हानांचा आणि कमतरतांचा सामना करत, कामाच्या निमित्ताने भ्रमंती करत, मिळालेल्या अनुभवातून शिकत गेलेले डॉ. ठाकूर हे जगभरातील जवळपास शहरात पोहोचलेले अस्सल कोकणी व्यक्तिमत्त्व आहे.
‘आपल्या आजूबाजूची लोकं, समाजासाठी कसं काम करतात? हे आपण शिकत गेलो आणि तसं काम करू लागलो तर समाज आपल्याला स्वीकारतो. समाजाच्या दृष्टीने आपण मोठे होतो. मोठ्या माणसांची ही प्रतिमा समाजानेच तयार केलेली आहे. म्हणून आपण काय? आणि किती शिकलो आहोत? यापेक्षा ठराविक शिक्षणानंतर समाजात काम करताना डोळसपणे, ज्ञानेंद्रिये उघडी ठेवून वावरलो तर त्यातून खरे शिक्षण मिळते ते महत्त्वाचे असते. याच शिक्षणातून आपले बहुश्रुत व्यक्तिमत्त्व आकाराला येते. आपण हे जे समाजातून शिकतो त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून समाजाला होतो. महाविद्यालयीन शिक्षणाचा उपयोग आपल्याला स्वतःपुरता होतो. अशी भूमिका मांडणारे आणि ‘रत्नागिरीत तिसऱ्या चौथ्या इयत्तेत शिकत असताना, खेळायच्या वयात नगर वाचनालयात जाऊन मुक्तद्वार विभागात दोन-दोन तास वाचनात घालविणारे, घडण्याच्या वयात अकरावी-बारावीला चिपळूणला जगण्याची पहिली पायरी मी चढलो’ असं ठाम प्रतिपादन करणारे डॉ. ठाकूर यांच्यासोबतचा संवाद हा ‘त्यांनी जगभरातील संचारातून मिळवलेल्या आणि अनुभवातून आलेल्या वैचारिक समृद्धतेचं दर्शन’ घडवणारा असतो.
भारतात डोळ्यांच्या उपचारासह जगभरात मल्टीस्पेशालिटी स्वरुपाची किमान सव्वा दोनशे हॉस्पिटल उभी करणाऱ्या डॉ. ठाकूर यांचा बांगलादेश, श्रीलंका, बर्मा, थायलंड, गल्फ कंट्रीज, साऊथ आफ्रिका आदी असंख्य देशात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात विशेष सहभाग राहिलेला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत लवकर पोहोचता येईल अशी वैद्यकीय क्षेत्रातील सेवा कोणती? असा विचार करून त्यांनी महाराष्ट्रात ‘इन्फिगो आय केअर’ नावाने डोळ्यांच्या दवाखान्यांची शृंखला निर्माण केली आहे. आपल्याकडे डोळ्यांचे उपचार करणारे डॉक्टर संख्येने कमी आहेत. त्यातही अनुभवी डॉक्टरांची आवश्यकता आहे. अनुभव हा, पेशंट डॉक्टरबद्दल बोलतो तेव्हा तयार होत जातो. असे कठीणतम स्थिती हाताळण्याचा पुरेसा अनुभव असलेले मेरिटचे डॉक्टर हे त्यांच्या ‘इन्फिगो’चे वैशिष्ट्य आहे. या साऱ्या प्रयत्नातून ते रत्नागिरी जिल्ह्याची वैद्यकीय सुविधेतील गुणवत्ता उंचावण्याचाही प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या पंधराव्या हॉस्पिटलचं उद्घाटन रत्नागिरीत कोरोना काळात झालं होतं. मानवी शरीरातल्या एकूण ऊर्जेपैकी सर्वाधिक ऊर्जा डोळ्यांसाठी खर्च होत असते. इतकं डोळ्याचं महत्त्व असूनही डोळ्यांकडे सर्वाधिक दुर्लक्ष केलं जातं. याचा विचार करून त्यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या ‘इन्फिगो’ची सेवा भविष्यात कोकणातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा मानस आहे. डॉ. ठाकूर हे मूळचे भांबेड (ता. लांजा) इथले रहिवासी आहेत. त्यांनी रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेत माध्यमिक, चिपळूणच्या डी.बी.जे. महाविद्यालयात १९८३साली उच्च महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या क्रमांकाने पूर्ण केलं होतं. पुढे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेमध्ये पाठविलेल्या शांतीसेनेतून वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी श्रीलंकेत जाण्याची संधी मिळाली होती.
जगभरातल्या आपल्या भ्रमंतीमधून नियमितपणे वेळ काढून डॉ. ठाकूर यांनी भांबेडमधल्या घरच्या आवारात बारा एकर जमिनीवर, सुमारे सतराशेहून अधिक वेगवेगळ्या वनस्पती जोपासत वनस्पतीशास्त्राचे जागतिक संदर्भ असलेलं उत्कृष्ट बॉटनिकल गार्डन फुलविलं आहे. मोजके अपवाद वगळले तर जगभरातल्या कोणत्याही वनस्पती कोकणात तग धरु शकतात, असे त्यांचे निरीक्षण आहे. स्वतःच्या वैयक्तिक ग्रंथालयात चाळीस हजार ग्रंथांचा संग्रह असलेले ग्रंथप्रेमी डॉ. श्रीधर ठाकूर हे पु. ल. देशपांडे, श्री. ना. पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार आदी लेखकांचे चाहते आहेत. कोकणातल्या वनस्पती आणि फळांपासून किती तऱ्हेचे रोजगार उपलब्ध होऊ शकतात? वाया जाणाऱ्या सर्व फळा-पिकांचा कोणता आणि कसा उपयोग होऊ शकतो? नवे रोजगार कसे निर्माण होऊ शकतात? कोकणात कोणते कारखाने काढता येऊ शकतात? कोकणात उत्कृष्ट बॉटनिकल गार्डन हायवे कसे साकारता येतील? अशा विषयांवरील मुलभूत चिंतनाचा अनुकरणीय साठा असलेल्या या व्यक्तिमत्त्वाला ‘लोटिस्मा’ने ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्याचे निश्चित केले आहे.
‘लोटिस्मा’च्या वतीने भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय अप्पासाहेब जाधव यांच्या नावाने वाचनालयाने सुरु केलेल्या ‘अपरान्त संशोधन केंद्र’तर्फे हा ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाने कोकणाचा नावलौकिक वाढविणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. यापूर्वीचे पुरस्कार नामवंत इतिहास संशोधक आणि डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना प्रदान करण्यात आले आहेत. वाचनालयाच्या निवड समितीचे अध्यक्ष अरुण इंगवले, सदस्य चंद्रकांत राठोड, राष्ट्रपाल सावंत, अंजली बर्वे यांनी हा निर्णय घेतला आहे. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी ‘लोटिस्मा’चा हा पुरस्कार एका कीर्तिवंत धन्वंतरी व्यक्तिमत्त्वाला देण्यात येत असल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहोळा लवकरच संपन्न होणार असल्याचे वाचनालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.